लोकसभा निवडणुकीची सध्या सगळीकडे धामधूम सुरू झाली असून निवडणुकीमध्ये भाजपचे खात उघडले आहे. गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार मुकेश दलाल हे सोमवारी बिनविरोध निवडून आल्याने सध्या या गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या संघातून काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्याने मुकेश दलाल निवडून आले आहेत. निलेश कुंभानी यांनी केलेल्या अर्जामध्ये साक्षीदारांची नावे आणि स्वाक्षरी करण्यात चूक झाल्याने त्यांचा अर्ज रद्द झाल्याचे सांगण्यात आले.
भाजप आणि काँग्रेससह या जागेसाठी १० जण रिंगणामध्ये उतरले होते. तर रविवारी ७ अपक्ष उमेदरावांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये केवळ बसपचे प्यारेलाल भारती राहिले होते, ज्यांनी सोमवारी आपला अर्ज मागे घेतला, ज्यामुळे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. गुजरात काँग्रेस पक्षाचे शक्तीसिंह गोहील यांनी सांगितले की, ‘कायदेशीर टीम सर्व पैलू तपासून पाहत असून चौकशी करत आहेत. हायकोर्टात आधी याचिका दाखल करावी की सुप्रीम कोर्टात यावर विचार चालू आहे’
दिनेश जोधानी यांनी केली तक्रार
भाजपचे माजी उपमहापौर दिनेश जोधानी यांनी निलेश कुंभानी यांच्या अर्जाच्या विरोधात बनावट सह्या करण्यात आल्याची तक्रारी निवडणूक आयोगाकडे केली होती. २१ एप्रिल रविवारी DEO सौरभ पारधी यांनी याचा खुलासा करण्यासाठी सकाळी ११ वाजेपर्यंत कुंभानी यांना वेळ दिला होता. दरम्यान अर्ज रद्द करण्यासाठी रविवारी जिल्हाधिकारी आणि निवडणूक प्राधिकरण यांच्यासमोर सुनावणी करण्यात आली आणि यावेळीदेखील स्वाक्षरी कऱणारे ४ प्रस्तावक हे गैरहजर राहिले. त्यामुळे निलेश कुंभानींचा अर्ज रद्द करण्यात आला.
काय म्हणाले मुकेश दलाल?

‘पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांचा मी आभारी असून लोकशाही पद्धतीनेच जिंकलो आहे. तसंच माझ्या मतदार संघाचा आणि कार्यकर्त्यांचा मी मनापासून आभारी आहे. जेव्हा विरोधकांच्या अपेक्षेविरूद्ध गोष्टी घडतात तेव्हा ते लोकशाहीची हत्या म्हणून पाहतात इतकंच मी सांगेन’ असे मत यावेळी मुकेश दलाल यांनी व्यक्त केले.
(वाचा – Election 2024| काँग्रेसला दिलेले मत हे राहुल गांधींना दिलेलं असेल, हे लक्षात ठेवा)
कोण आहेत मुकेश दलाल?
गेल्या ४३ वर्षांपासून भाजपसह कार्यरत असणारे मुकेश दलाल हे सलग ३ वेळा सुरतमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. याशिवाय भाजप युवा मोर्चामध्येही त्यांनी महत्त्वाच्या पदांवर अनेक वर्ष काम केले आहे. दरम्यान मुकेश दलाल हे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांचे निकटवर्तीय असल्याचेही सांगितले जाते.