तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघाचे मनोबळ उंचविण्यासाठी देशभरात रविवारी सकाळपासूनच उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या चिवट फलंदाजीमुळे आणि गोलदांजाच्या अचूक टप्प्यामुळे कोट्यावधी भारतीयांच्या पदरी निराशा आली. टीम इंडियाच्या हातातून विजय निसटल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी आपले टीव्ही बंद करीत आपली निराशा दाखविली. पण त्याचवेळी कोट्यावधी भारतीयांनी अंतिम स्पर्धेपर्यंत पोहचणाऱ्या टीम इंडियाचे कौतुक मात्र तेवढेच आनंदाने आणि उत्सहाने केले.
आयसीसी मेन्स वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुरुवातीपासून विजयी घौडदोड कायम ठेवणाऱ्या टीम इंडियाला अखेरच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. अहमदाबाद येथे पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल सात विकेटने विजय संपादन करीत विश्वचषकावर आपले नाव कोरलं. भारतीय फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे या सामन्यात पराभव पत्कारावा लागला असल्याची चर्चा क्रीडा विश्वात सुरु झाली आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाने पकड मजबूत ठेवली होती. प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलदांजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या गोलदाजांनी यशस्वी करुन दाखविला. भारतीय फलंदाजांना अवघ्या २४१ धावांवर गुंडाळत ऑस्ट्रेलियाने विजयाचा मार्ग सोप्पा केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांवर वर्चस्व मिळवित या विजयावर कळस चढविला. ऑस्ट्रेलियाने आज अचूक गोलदांजी करीत, चपळ क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन करीत आणि बिनधास्त फलदांजी करीत अंतिम सामन्यात भारताला पराभवाची धुळ चारली आहे.
ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेच्या सुरुवातीला म्हणावी तशी कामगिरी बजाविता आलेली नव्हती. पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर गुणतख्त्यात शेवटच्या स्थानावर ऑस्ट्रेलिया होती. त्यावेळी या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर जाईल, अशी चर्चा सुरु झाली असताना ऑस्ट्रेलियाने नंतरच्या सामन्यांमध्ये भरीव कामगिरी करीत स्पर्धेचे आव्हान कायम ठेवित सेमीफायनल आणि नंतर अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. त्यानंतर सहाव्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेचे टायटल आपल्या नावावर करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुरुवातीपासूनच विजयाची घौडदोड सुरु ठेवित या स्पर्धेत आपला ठसा उमटविला. ऑस्ट्रेलियाचे गोलदांजच या विजयाचे शिल्पकार ठरलं. दरम्यान, अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयने केलेली तयारी उभ्या देशाचे लक्ष वेधून घेणारी होती.