shami

Mohammed Shami | भारत आणि न्यूझीलंडदरम्यान खेळण्यात आलेल्या मॅचमध्ये ७ विकेट्स घेत मोहम्मद शामीने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळविण्याचा विक्रमही आपल्या नावावर करून घेतलाय. मात्र व्यक्तीगत आयुष्यात अनेक संघर्षाला सामोरे जात शमीने इथपर्यंतचा टप्पा गाठला आहे.

आयुष्याला आणि नशिबाला शिव्या घालणाऱ्या व्यक्तींनी शमीकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. शमीचा प्रवास हा अत्यंत अवघड असूनही कधीही हार न मानता मेहनत करत राहिल्यास नशीब फळफळतं हेच दर्शविणारा आहे. आपल्या करिअरच्या उत्तम टप्प्यावर असणाऱ्या मोहम्मद शमीने व्यक्तीगत आयुष्यात फारच संघर्ष पाहिला आहे आणि त्याबाबत प्रत्येकानेच जाणून घेतलं तर आयुष्य जगण्यासाठी नक्कीच आदर्श ठरेल.

आत्महत्या करण्याचा केला होता प्रयत्न

पत्नीशी भांडण, सतत त्रास, टीममधून शामी बाहेर झाला होता. तीन वर्षांपूर्वी त्याने रोहितशी मुलाखतीदरम्यान हा खुलासा केला होता. आयुष्यातील त्रास आणि नकारात्मकता इतकी जास्त झाली की होती आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याबाबत सांगितले होते. एकदाच नाही तर ३ वेळा आयुष्यात आत्महत्या करण्याचा विचार मनात आल्याचेही त्याने सांगितले. २०१५ च्या विश्वकपनंतर दीड वर्ष त्याला संघाच्या बाहेर ठेवण्यात आले होते आणि पत्नी हसीन जहाँने दिलेल्या त्रासामुळेही शामीला आयुष्यात खूपच चढउतार पाहायला मिळाले. त्यामुळे शामी फारच खचला होता.

कुटुंबाची पूर्ण साथ

या सगळ्यामधून बाहेर येण्यासाठी त्याला कुटुंबाची पूर्ण साथ मिळाली. कुटुंबातील व्यक्तींच्या पाठिंब्यामुळेच त्याने या वर्ल्डकपमध्ये कमालीची कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. शामी सुरूवातीच्या मॅचमध्ये संघाबाहेर बसून होता. मात्र एका मॅचमध्ये संधी मिळाल्यानंतर त्याने त्या संधीचे सोने केले आणि रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. वर्ल्डकपनंतर शामीच्या शांतपणाचे आणि त्याच्या खेळाचे जबरदस्त फॅन्स झाले आहेत. त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. या सगळ्यामध्ये केवळ त्याची मेहनत आणि संधीची वाट पाहण्यासाठी असलेली त्याची सहनशक्ती हेच महत्त्वाचं आहे.

शमीकडून काय शिकावे
कितीही त्रास झाला, कितीही संकटं आली तरीही आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला आणि संधी मिळाल्यावर त्याचे सोनं करण्यासाठी लागणारी मेहनत करत राहाणं महत्त्वाचं आहे. त्रास प्रत्येकाला असतो मात्र त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःला तयार करणेही महत्त्वाचे आहे. शामीकडे पाहिल्यानंतर या बाबतीत त्याचा खरंच आदर्श ठेवावा. नात्यामध्येही शामीला अपयश आले मात्र या सगळ्याचा वचपा त्याने आपल्या मेहनतीने काढलेला दिसू येत आहे.

(photo courtesy: मोहम्मद शामी Instagram)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *