south mumbai election

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता अधिक रंगू लागली आहे. मुंबईत पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी तयारीचा वेग वाढला असून यात प्रामुख्याने मुंबईतील दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघाकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघातून आतापर्यंत अनेकांची केंद्रात मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. तर आताच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीतही माजी केंद्रीय मंत्र्यांचा नावांचा समावेश असल्याने हा मतदार संघ महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. मुख्य म्हणजे, दक्षिण मुंबईत जातीय समीकरण लक्षात घेता याठिकाणी हिंदुत्त्ववादी चेहऱ्याला अधिक पसंती दिली जाईल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. 

(वाचा – Breaking: Mukesh Dalal | लोकसभा निवडणुकीत उघडले भाजपचे खाते, सुरतचे उमेदवार बिनविरोध विजयी)

जागा नक्की कोणाला?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असले तरी मुंबईसह राज्यातील अनेक मतदारसंघाबाबत महायुतीचे एकमत झालेले नाही. यात प्रामुख्याने मुंबईसह पालघर, नाशिक या मतदारसंघाचा समावेश असला तरी यात सर्वांचे लक्ष दक्षिण मुंबई मतदारसंघावर लागून राहिले आहे. या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरविंद सावंत यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. अरविंद सावंत यांनी याअगोदर केंद्रात मंत्री पद भूषविले आहे. त्यातच मुंबईच्या राजकारणात दक्षिण मुंबईत अनेक कारणांमुळे महत्त्वाची मानली जाते. या मतदारसंघातील जातीय समीकरण, सनदी अधिकाऱ्यांची लोकवस्तीसह उद्योगपतींची मांदियाळी या मतदारसंघात पहायला मिळते. त्यामुळे राज्य आणि केंद्रासाठी हा मतदारसंघ अधिक महत्त्वाचा मानला जातो. 

(वाचा – UBT पक्षातून बंडखोरीची शक्यता, पक्षश्रेष्ठींना आखावी लागणार रणनिती)

दक्षिण मुंबईसाठी नावे

सध्या याठिकाणी महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघात लागून राहिले आहे. सध्या या मतदारसंघासाठी महायुतीकडून शिवसेनचे मिलिंद देवरा, यामिनी जाधव यांच्यासह भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांचे नावे चर्चेत असली तरी त्यावर एकमत झालेले नाही. मात्र सध्या या मतदारसंघाचा आढावा लक्षात घेता आणि स्थानिक मतदारांच्या अपेक्षा लक्षात घेता या मतदारसंघात हिंदुत्त्ववादी चेहरा महायुतीसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो, असा जोरदार चर्चा सध्या मतदारसंघात वर्तविली जात आहे.

हिंदुत्त्ववादी चेहरा

या मतदारसंघातून जाणीवपूर्वक एमआयएम फॅक्टरही चालविले जाणार असल्याने याठिकाणी हिंदुत्त्ववादी चेहरा दिलास नक्कीच त्याचे रुपांतर मतांमध्ये होऊ शकतो, अशी राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय या मतदारसंघात सध्या लालबाग, परळ, गिरगाव, माझगाव या सारखा मराठी भाषिकांचे प्राबल्य असणारा मतदारसंघही असल्याने हिंदुत्त्ववादी चेहराच मतदारांच्या पसंतीचा ठरेल, असे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने निवडणूक पूर्व केलेल्या सर्वेक्षणातही याचा उल्लेख करण्यात आल्याची बाब पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून दबक्या आवाजात बोलली जाते आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात कोणाला संधी दिली जाते, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *