UBT शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक नेत्यांना विचारात न घेता ही यादी जाहीर केल्याने पदाधिकाऱ्यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्याचे परिणाम म्हणून पक्षातून बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात प्रामुख्याने मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासह दक्षिण मध्य मुंबई, सांगली आणि शिर्डी मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दक्षिण मध्य मुंबईसह एकूण 16 जणांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यात प्रामुख्याने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेली सांगलीच्या जागेसह, शिर्डी आणि दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईच्या जागांचा समावेश आहे. महाविकास आघाडीमध्ये असताना शिवसेनेने केलेल्या या घोषणेमुळे काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारपासून त्यांनी इतर पर्यायांची चाचपणीही सुरु केल्याचे कळते. यात अनेकांनी पक्षातील वरीष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही या इच्छुक उमेदवारांची आपले सर्वस्व पणाला लावले आहे.
यात प्रामुख्याने उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी इच्छुक असलेले काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला अन्य पर्याय खुले असल्याचे सांगितले आहे. सांगलीतील जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरु आहे, त्या मतदारसंघातही काही स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून तेही बंडखोरीच्या तयारीत असल्याचे कळते.