भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघासाठी प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देत गेल्या काही दिवसांपासून असणारी चर्चा संपुष्टात आणली आहे. तर यामुळे दोन वेळा निवडणूक लढवून निवडून आलेल्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना डच्चू देण्यात आल्याने वेगळ्याच चर्चेला सुरूवात झाली आहे.
पूनम महाजन यांचा पत्ता कटक करून १९९३ च्या मुंबई बाँबस्फोट खटला आणि अशा अनेक खटल्यांमध्ये अतिरेक्याना जन्मठेप देणाऱ्या, सरकारची बाजू लावून धरणाऱ्या उत्तम कायदेतज्ज्ञ असणाऱ्या उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करत वेगळाच डाव खेळल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे नाव चर्चेत असून त्यावर मोहर लावण्यात आल्याचे आता दिसून आले आहे. (फोटो सौजन्य – फेसबुक)
चर्चेला पूर्णविराम

२ दिवसांपूर्वीच काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांचे नाव घोषित झाले असून उद्धव ठाकरे यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न असल्याचे घोषित करत आपली भूमिका स्पष्ट केली होती. तर उत्तर मध्य मुंबईसाठी त्यानंतर जोरदार हालचाली सुरू झाल्या मात्र या शर्यतीत पूनम महाजन, आशिष शेलार यांची नावं आघाडीवर होती. पण सर्व चर्चांना पूर्णविराम लावत आता उज्ज्वल निकम यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
(वाचा – South Mumbai Seat | हिंदुत्त्ववादी चेहऱ्याला मिळेल पसंती, दक्षिण मुंबईत राजकीय समीकरणाचा बदल)
पूनम महाजनांना का डच्चू?
२०१९ मध्ये पूनम महाजन या १ लाख ३७ हजार मतांनी निवडून आल्या मात्र मतदारांशी हितगुज न केल्याने, सतत कार्यकर्त्यांच्या तक्रारी आणि अन्य काही कारणांमुळे पुन्हा उमेदवारी न देण्यात आल्याच्या चर्चांना आता सुरूवात झाली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनाही निवडणूक लढविण्याचा आग्रह करण्यात आला होता मात्र त्यांनी नकार दिल्याने उज्ज्वल निकम यांचे नाव समोर आले असंही सांगण्यात येते आहे.
(वाचा – Breaking: Mukesh Dalal | लोकसभा निवडणुकीत उघडले भाजपचे खाते, सुरतचे उमेदवार बिनविरोध विजयी)
संपूर्ण ताकदीने आव्हान पेलणार – निकम
‘भाजपाने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा आभारी आहे. राजकारण नवे क्षेत्र असल्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण माझे प्रयत्न प्रामाणिक अशतील आणि सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन. भाजपाने जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे, ती पूर्ण करण्याचा मी ताकदीनिशी प्रयत्न करेन’ अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.