Hardik Pandya Statement: अनुभवी जसप्रीत बुमराहच्या (3 विकेट्स) शानदार गोलंदाजीमुळे आशुतोष शर्माची 28 चेंडूत 61 धावांची खेळी धुळीस मिळाली, त्यामुळे मुंबई इंडियन्सने आयपीएल टी-20 सामन्यात अतिशय रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवच्या 53 चेंडूंत 78 धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सात विकेट्सवर 192 धावा केल्यानंतर पंजाबचा डाव 19.1 षटकांत 183 धावांत गुंडाळला. या विजयासह मुंबई सात सामन्यांत तीन विजयांसह सातव्या स्थानावर पोहोचली, तर पंजाब सात सामन्यांतील पाचव्या पराभवानंतर नवव्या स्थानावर घसरला. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
हार्दिक पांड्याने दिली प्रतिक्रिया

पंजाब किंग्जविरुद्धच्या या रोमांचक विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, ‘क्रिकेटचा अतिशय अप्रतिम सामना झाला. या सामन्यात खेळाडूंची खरी कसोटी लागणार असल्याचे आम्ही सामन्यापूर्वी बोललो होतो. साहजिकच तुम्हाला असे वाटते की तुम्ही सामन्याचे नेतृत्व करत आहात, परंतु आम्हाला माहीत होते की आयपीएलमध्ये असे रोमांचक सामने निर्माण होतातच.’
(वाचा – IPL 2024 | आयपीएलमध्ये या ५ युवा खेळाडूंचा जलवा, लवकरच उघडतील टीम इंडियाचे दरवाजे!)
हार्दिक पांड्याने केले आशुतोष शर्माचे कौतुक
आशुतोष शर्माचे कौतुक करताना हार्दिक पंड्या म्हणाला, ‘मैदानात येऊन असे खेळणे अविश्वसनीय आहे. त्याने अत्यंत चांगली कामगिरी करत झुंज दिली. आम्ही टाइमआउटमध्ये ठरवले होते की आम्ही किती मजबूत दिसतो हे महत्त्वाचे नाही, आम्ही या सामन्यात राहू आणि तो सामना पूर्ण करू. आम्ही काही षटकांमध्ये खूपच हलके खेळलो. तरीही, विजय हा विजयच असतो.
आशुतोषची चौफेर फटकेबाजी

पंजाब संघाने 14 धावांत चार विकेट गमावल्या होत्या, परंतु आशुतोष आणि शशांक सिंग (25 चेंडूत 41 धावा) यांनी आपल्या शानदार फलंदाजीने संघाला उंबरठ्यावर नेले. आशुतोषने आपल्या खेळीत सात शानदार षटकार आणि दोन चौकार लगावले. त्याने हरप्रीत ब्रार (21) सोबत आठव्या विकेटसाठी 32 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली.
बुमराह-कोएत्झीने 3-3 विकेट्स घेतल्या

शशांकनेही तीन महत्त्वाच्या भागीदारी करत पंजाबचा डाव सावरला. त्याने पाचव्या विकेटसाठी हरप्रीत सिंग (13) सोबत 28 चेंडूत 35 धावा, सहाव्या विकेटसाठी जितेश शर्मा (9) सोबत 15 चेंडूत 28 धावा आणि आशुतोषसोबत 17 चेंडूत 34 धावा जोडल्या. सामनावीर बुमराहशिवाय जेराल्ड कोएत्झीनेही तीन बळी घेतले. आकाश मधवाल, कर्णधार हार्दिक पंड्या आणि श्रेयस गोपाल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाल्याचे दिसले.