खूप जणांचे शरीर हे काही पदार्थांना वेगळेच रिॲक्ट करते. दही, दूध, तूप, आंबट पदार्थ किंवा एखादे फळ सगळ्यांच्याच शरीरावर सारखा परिणाम करते असे अजिबात नाही. काही खाद्यपदार्थ हे एखाद्याच्या शरीरावर चांगला परिणाम करतात. तर काही पदार्थ हे विपरित परिणाम घडवू आणत असतात. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर अचानक खाज सुटणे, पुरळ येणे, त्वचा लाल होणे असे काही त्रास होत असतील तर तुमच्या आहारातून काही गोष्टी या योग्यवेळी काढून टाकणे फारच गरजेचे आहे. काही उदाहरणांसह आपण याची माहिती घेऊया.
एका कॉलेजवयीन मुलीचे तोंड अचानक इतके सुजायचे की, चेहऱ्यावरील इतर सगळ्या गोष्टी दिसेनाशा होऊन जायच्या. तिला काही दुखत खुपत नव्हते. परंतु तरीही ती सूज काही केल्या उतरायची नाही. तिला रुग्णालायत जाण्याशिवाय काहीही पर्याय उरायचा नाही. तिला कशाची तरी इलर्जी झाली असावी हे कायम असायचे पण नेमकी कशाची? हे काही केल्या डॉक्टरांना कळत नव्हते. पण काही दिवस सातत्याने ही गोष्ट झाल्यानंतर एक लक्षात आले की, तिच्या जेवणात ज्यावेळी छोलेची भाजी असायची त्याच दिवशी तिला हे व्हायचे. छोले मसाल्यातील आमचूर ही पावडर तिला बाधत होती. त्यामुळे तिचा चेहरा सुजत होता. त्यानंतर मुद्दाम आमचूर पावडर ज्यावेळी तिच्या सेवनात आली त्यानंतर या वर शिक्कामोर्तब झाले.
सांगायचे तात्पर्य असे की, आपल्या सगळ्यांना शरीराच्या बदलानुसार असे काही त्रास असतात. पण ते जोवर दिसत नाहीत तोवर लक्षात येत नाही. काही पदार्थ आरोग्यासाठी चांगले असले तरी देखील काहींच्या शरीराला ते नक्कीच बाधतात असे निदर्शनास आले आहे. जर एखाद्या पदार्थाच्या खाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरळ, खाज येत असेल किंवा अचानक सूज येत असेल तर तुम्ही नेमका कोणता पदार्थ कधी खाताय हे पाहायला हवे.
अजिबात खाऊ नका हे पदार्थ
काही खाद्यपदार्थ असे आहेत जे कितीही चांगले असले तरी देखील त्याचे उशीरा सेवन हे आरोग्यासाठी फारच घातक मानले जाते. त्यामध्ये आंबट पदार्थ,दही,लोणची, आमचूर पावडर, चाट मसाला, चटण्या असे काही रात्रीच्या वेळात खाऊ नका. कारण त्यामुळे तुम्हाला असे त्रास होऊ शकतात.
आता कोणताही पदार्थ संध्याकाळी खाताना या गोष्टीचा एकदा तरी विचार करा.