Silver Pomfret | मासे खाणाऱ्यांसाठी ही बातमी खूपच महत्वाची असणार आहे. जर तुम्हाल पापलेट मासा आवडत असेल तर या माशाला आता राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आले आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित किसान क्रेडिट कार्ड वरील राष्ट्रीय परिषदेत याची घोषणा केली आहे. या निमित्ताने मासे संवंर्धनाकडे मत्स्यशेतीचा कल अधिक वाढेल अशी अपेक्षा आहे.
गेल्या काही वर्षांपासून पापलेट(संरगा) या माशांची संख्या कमी आढळून आली आहे. भारतातील अनेक राज्यांनी आपल्या राज्यातील वैशिष्ठ्यपूर्ण निवडक मत्स्य प्रजातीची शाश्वतता, संवर्धन आणि वाढीसाठी ‘राज्य मासा’ म्हणून घोषित केले आहेत. जेणेकरून या माध्यमातून त्या राज्यात माश्याचे जतन – संवर्धन, सागरी पर्यावरण, जीव साखळी आणि मच्छिमारांची आर्थिक उपजीविका टिकवून ठेवता येईल.

महाराष्ट्र राज्याच्या मासेमारी उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासोबत सिल्वर पॉम्फ्रेट (पापलेट/सरंगा) मासा त्याच्या स्वादिष्ट चव आणि अपवादात्मक पौष्टिक मूल्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पर्यावरण आणि मासेमारी अर्थव्यवस्थेत सिल्वर पॉमफ्रेटला विशेष स्थान आहे. पापलेट ही मस्त्य प्रजाती नामशेष होऊ नये यासाठी प्रबोधन, नियमन होणे या दृष्टिकोनातून सिल्वर पॉमफ्रेटला (पापलेट/सरंगा) महाराष्ट्राचा ‘राज्य मासा’ म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे सातपाटी येथील दोन्ही मच्छीमार सहकारी संस्थांचे संयुक्त निवेदन मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आले होते.
पॅम्पस आर्जेन्टियस (Pampus argenteus), सिल्व्हर पॉमफ्रेट (Silver Pomfret), ही प्रजाती इंडो-वेस्ट पॅसिफिक, आशिया आणि पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्टीतील क्षेत्रात आढळते. सिल्व्हर पोम्फ्रेट्स सामान्यतः पांढऱ्या रंगाचे असून व लहान खवले असणारा मासा आहे. सिल्व्हर पॉम्फ्रेट या माश्याला स्थानिक पातळीवर पापलेट किंवा सरंगा म्हटले जाते. पालघर जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात सिल्व्हर पॉम्फ्रेट मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने हे क्षेत्र ‘गोल्डन बेल्ट’ म्हणून प्रसिद्ध आहे.
सगळ्यात जास्त निर्यात होणारा मासा
पापलेट हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त निर्यात केल्या जाणाऱ्यापैकी व्यावसायिकदृष्ट्या महत्वाचे आणि पसंतीचे एक सागरी अन्न आहे. महाराष्ट्र राज्य मत्स्य विभागाने सिल्व्हर पॉमफ्रेटचे महत्व जाणून ऑक्टोबर 2022 मध्ये टपाल तिकिट सुद्धा प्रसिद्ध केले आहे. या प्रजातीचे मासे 500 ग्रॅम किंवा अधिक पर्यंत वाढू शकतात. तथापि, जास्त मासेमारी केल्यामुळे, जुवेनाईल फिशिंग, जागतिक तापमानवाढ (Global Warming) व प्रदूषण इत्यादीमुळे ह्या प्रजातीच्या मासेमारीवर परिणाम दिसून आलेला आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून सिल्वर पॉम्फ्रेटचे उत्पादन कमी होत असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पापलेटचे वार्षिक उत्पादन सन 2019-20 मध्ये 18000 टन व सन 2020-21 मध्ये 14000 टन इतके होते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पापलेट व्यापारातील बदलासह मासेमारी पद्धतीतील बदलांमुळे लहान आकाराच्या पापलेट माश्यांची मासेमारी मोठ्याप्रमाणात होत असल्याने भारताच्या वायव्य भागातील पापलेट माश्याचा साठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे.
आता सिल्व्हर पापलेटला राज्य मासा घोषित केल्यामुळे त्याची किंमत अधिक वाढेल यात काहीही शंका नाही.