Wardha Crime |वर्धा जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे या आश्रमशाळेत हा सारा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवम सनोज उईके (वय 12) असे विद्यार्थ्याचे नाव असून अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील डोमा हे त्याचे गाव आहे. ही आश्रमशाळा आर्वीचे भाजपचे आमदार दादाराव केचे यांची असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
बुधवारी रात्री सगळे कार्यक्रम आटोपल्यानंतर मुले झोपण्यासाठी म्हणून गादी घेण्यासाठी आली होती.त्यावेळी गादी उचलताना गादी खाली दबलेला शिवम दिसला. याची माहिती लगेचच तेथील प्रशासनाला देण्यात आली. त्यामुळे शिवमचा मृतदेह हाती लागला. परंतु मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी तो काही तास शाळेत होता. त्याने काही वर्गही केले. पण नंतर तो दिसला नाही. तो नाही याची चौकशी कोणत्याही शिक्षकाने केली नाही. त्यामुळे शिवम हा तेथे नाही याची माहिती मिळू शकली नाही. रात्री साडेआठच्या सुमारास त्याचा मृतदेहच मुलांना दिसला.
आश्रमशाळेने दिलेल्या माहितीनुसार त्यादिवशी रक्षाबंधनाचा खूप मोठा कार्यक्रम होता. संबंध शाळा ही त्या कार्यक्रमात व्यग्र होती. त्यामुळे शिवम नव्हता याकजे कोणाचेही लक्ष गेले नाही.
दरम्यान मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी कसून चौकशी करण्याचा विनंती केली आहे. शिवमचा मृतदेह जिल्हा पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदन हा ऑन कॅमेरा केला जाणार आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण कळण्यास मदत होईल असा विश्वास आहे.