कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा व खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यातील जवळपास ६५ हजार युवक-युवतींना रोजगार मेळाव्यात आपला सहभाग नोंदवला. महारोजगार मेळाव्यात ३०० पेक्षा अधिक कंपन्या व आस्थापनांनी सहभागी झाल्या आहेत. यामेळाव्यातून १० हजार रोजगार निर्माण होणार आहेत.
शासन राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रमाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून यामाध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत ३ लाख ७३ हजार कोटींचे करार करण्यात आले असून यातून २ लाख तरूणांना रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिरास त्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून थेट सहभागी होत मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.
जिल्ह्यात दोन ठिकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री लोढा म्हणाले की, पंधरा दिवसांच्या आत राहाता (शिर्डी) व अहमदनगर येथे संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करण्यात येईल. एक महिन्याच्या आत अहमदनगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास संस्था सुरू करण्यात येईल. या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याबरोबर परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक आयटीआय सुरू करण्यात येऊन युवकांना १५ दिवसाचा कौशल्य अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.
याचा फायदा अधिकाधिक नागरिकांना होण्यास मदत होईल.