Rahul Shewale शिवसेना गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार शेवाळे यांच्या पत्नी कामिनी, मुलगा स्वयम आणि वेदांत उपस्थित होते. यावेळी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. तसेच गेल्याच महिन्यात मातृशोक झालेल्या खासदार शेवाळे यांचे मोदीजींनी सांत्वन देखील केले.

या भेटीदरम्यान खासदार शेवाळे यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची शिल्पाकृती आणि समग्र सावरकर ग्रंथाचे खंड भेट म्हणून दिले. भेटी नंतर पत्रकारांसोबत बोलताना खासदार म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या भेटीने नवी ऊर्जा मिळाली. माझ्या लोकसभा मतदारसंघातील धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत देखील या भेटीत चर्चा झाली. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करेल, अशी ग्वाही देखील यावेळी माननीय पंतप्रधानांना दिली .