Maratha Aarkshan साठी मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्याची वाट धरली. आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय काही परतणार नाही असा पवित्रा घेतला आणि गोंधळ उडाला. परंतु आता जरांगेच्या या वाढत्या मागण्यांवरुन त्यांच्यावरच टीका होऊ लागली आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर मनोज जरांगे पाटील नको त्या टीका करत सुटले आहेत अशी टीका ज्येष्ठ राजकारणी छगन भुजबळ यांनी केली आहे. टीका करताना त्यांनी जरांगेच्या काही मागील गोष्टींची आठवण करुन दिली आहे.
अभ्यास नाही, शिक्षण नाही….
जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे यांचे शिक्षण नाही, त्यांचा अभ्यास नाही ते काहीही बडबड करत सुटले आहेत आणि मागण्या करत सुटले आहेत. त्यांच्या मागण्या या मारुतीच्या शेपटीप्रमाणे झाल्या आहेत. ज्या आटोक्यातच येत नाही. जरांगे यांनी या आधीही अनेकांवर टीका केली आहे. आता तर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शिव्या देत आहेत. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करता त्यांचे हे वागणे सुरु आहे. मनोज जरांगे यांचे सहकारीच आता त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांची चौकशी होणे आता फारच गरजेचे आहे. जरांगेचं एकूणच सगळं नाटकं आहे असेच दिसत आहे.
काय म्हणाले होते जरांगे?
माझ्या बदनामी मागे देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर राज्यात काहीही होऊ शकत नाही. फडणवीसांचं न ऐकल्यावर काय होतं, ते तुम्हाला सांगतो. जो माणूस स्वत:चा पक्ष कधीच सोडू शकत नाही, अशा लोकांवर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली. एकनाथ खडसे यांच्यावर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली. विनोद तावडे महाराष्ट्रातून कधीच बाहेर जाणार नव्हते. मात्र त्यांना दिल्लीला जावे लागले. नाना पटोले यांनादेखील फडणवीसांमुळे भाजपा सोडून जावे लागले. पंकजा मुंडे आयुष्यातही भाजपा सोडण्याचा विचार करू शकत नाहीत. मात्र भाजपात त्यांची घुसमट होत आहे. फडणवीस हे महादेव जानकर यांना धनगरांचा नेता म्हणून मोठं होऊ देत नाहीयेत,” असे जरांगे म्हणाले होते.