स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून भविष्यात ते आणखी भयावह रूप घेऊ शकते असा अहवाल आता समोर आलाय. लॅन्सेट कमिशनच्या नवीन अहवालानुसार, जगभरात स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत आणि 2040 पर्यंत दरवर्षी 1 दशलक्ष महिलांचा मृत्यू होण्याचा धोका आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, 2020 पर्यंत गेल्या पाच वर्षांत सुमारे 78 लाख महिलांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते, तर त्याच वर्षी सुमारे 6.85 लाख महिलांचा या आजाराने मृत्यू झाला होता.
याहूनही त्रासदायक गोष्ट म्हणजे लॅन्सेट कमिशनच्या अहवालानुसार, जगभरातील सरासरी दरानुसार, 12 पैकी एका महिलेला वयाच्या 75 वर्षापूर्वी स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. हा आकडा सातत्याने वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे. संशोधकांचा अंदाज आहे की 2020 मध्ये जगभरात स्तनाच्या कर्करोगाची 23 लाख प्रकरणे नोंदवली गेली होती, जी 2040 पर्यंत 30 लाखांपेक्षा जास्त वाढू शकते. या वाढीमध्ये कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांचा (एलएमआयसी) मोठा वाटा असेल हे उल्लेखनीय. (फोटो सौजन्य – iStock)
(वाचा – Weight Loss Tips | शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यातील चरबी होईल कमी, डाएटमध्ये समाविष्ट करा हा मसाला)
उशीरा कळतो ब्रेस्ट कॅन्सर

विकसित देशांच्या तुलनेत LMIC देशांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान उशिराने होते, ज्यामुळे उपचारांनादेखील उशीर होतो आणि मृत्यूचे प्रमाण जास्त वाढते, हेही अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. लॅन्सेट कमिशनच्या संशोधकांनीही या अहवालात स्तनाच्या कर्करोगाचा सामना करण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. यामध्ये जागरुकता वाढवणारे प्रोग्राम, सुधारित स्क्रीनिंग, उपचारांसाठी उत्तम प्रवेश आणि संशोधनासाठी अधिक निधीचे वाटप यांचा समावेश आहे.
(वाचा – गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना जोडीदाराला आधाराची गरज)
काय सांगतात तज्ज्ञ

निरोगी जीवनशैलीचा अवलंब, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करून स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करता येतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच, स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे जसे की स्तन टाईट होणे, स्तनाचा आकार बदलणे किंवा स्तनाग्रातून रक्त येणे इ. कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हा अहवाल स्तनाच्या कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात एक चेतावणी देणारा आहे. वेळीच ठोस पावले उचलून आपण या घातक आजाराचा प्रसार रोखू शकतो आणि महिलांचे प्राण वाचवू शकतो.