गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी छत्तीसगड आणि राजस्थान हे पैसे लुटण्यासाठी काँग्रेस पक्षाचे एटीएम असल्याचा आरोप केल्याने, गिरीश चोडणकर यांनी त्याला हरकत घेत गोव्यातील विविध घोटाळ्यातून लुटलेले पैसे हे दिल्लीतील भाजप नेत्यांचे एटीएम बनले आहे का, असा सवाल केला आहे. .
“मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल प्रसार माध्यमांशी संवाद साधताना छत्तीसगड आणि राजस्थान ही काँग्रेससाठी एटीएम मशीन असल्याचे सांगितले. ते असे आरोप करत आहेत कारण त्यांच्यासह गोव्यातील त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी अशा प्रकारांमध्ये गुंतले आहेत,” असे चोडणकर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “मी त्यांना विचारू इच्छितो की दिल्लीत बसलेल्या भाजप नेत्यांसाठी गोवा हे एटीएम मशीन आहे का?, कारण त्यांनी दोनदा गोव्यातील लोकशाही आणि विरोधी पक्ष नष्ट करण्यासाठी करोडो रुपये देऊन काँग्रेसचे आमदार विकत घेतले. सावंत ज्यांना भ्रष्ट म्हणत आहे त्या पक्षाच्या आमदारांना विकत घेताना भाजपला लाज वाटायला हवी,’ असे चोडणकर यांनी नमूद केले.
गोव्यातील भाजप सरकार खनिज लिलाव घोटाळा, अबकारी घोटाळा, जमीन रूपांतरण घोटाळा, औषध खरेदी घोटाळा, आरोग्य विभाग घोटाळा, नोकरीसाठी घोटाळा, झुआरी जमीन, जमीन हडप घोटाळा, स्मार्ट सिटी घोटाळा, कॅसिनो घोटाळा, भरती घोटाळा यासाठी ओळखले जाते, तसेच कामगार घोटाळा, ऑक्सिजन घोटाळा, पूल आणि महामार्ग घोटाळा, टॅक्सी मीटर घोटाळा, सार्वजनिक बांधकाम घोटाळा आणि वित्त विभागातील टक्केवारी घोटाळा, सोन्याची तस्करी घोटाळा आणि राष्ट्रीय खेळ घोटाळ्यासाठीही भाजप ओळखले जात आहे.
चोडणकर म्हणाले, “प्रमोद सावंत यांनी त्यांच्या आशीर्वादाने होणारे हे घोटाळे रोखण्यात का अपयशी ठरले याचे उत्तर द्यावे.”कर्नाटकात हरल्यानंतर सावंत म्हणाले होते की कर्नाटक हे काँग्रेसचे एटीएम आहे, आम्ही त्यांना विचारू इच्छितो की भाजपची सत्ता असलेली राज्ये त्यांची एटीएम आहेत का,” असे ते म्हणाले.
प्रमोद सावंत आणि त्यांचे पक्षाचे सहकारी ज्याप्रकारे भारतातील एकता पाहून हतबल होऊन निराशा व्यक्त करत आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते की ते आपल्या स्वार्थासाठी देशाचे विभाजन करण्यासाठीकोणत्याही थराला जातील, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले
“लोकसभा निवडणुकीवर नजर ठेवून, भाजपशासित राज्यांनी योजनांचा मोठा लाभ देण्यास सुरुवात केली आहे कारण त्यांना माहित आहे की तेथे भाजपविरोधी लाट आहे. सध्या ते विरोधी पक्षांना लक्ष्य करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील जनता कोणत्याही डावपेचांना बळी पडणार नाही, असे चोडणकर म्हणाले.
“भाजपने कर्नाटक निवडणुकीसाठी विविध व्यावसायिकां कडून वसुली केली आहे आणि इतर निवडणुकांसाठी कंत्राटदारांकडून कोट्यवधींची रक्कम उकळली आहे. मला आशा आहे की सावंत स्वतःच्या एटीएमबाबत स्पष्टीकरण देतील,” असे चोडणकर म्हणाले.