Dawood- Mandakini Love story ही पुन्हा एकदा चर्चेत आली ती दाऊदसंदर्भात आलेल्या एका नव्या बातमीमुळे. पाकिस्तानात दाऊदवर विषप्रयोग झाला आणि त्याची परिस्थिती नाजूक असल्याचे कळले. सध्या दाऊद सुखरुप असल्याचे कळत आहे. परंतु या निमित्ताने पुन्हा एकदा अभिनेत्री मंदाकिनीचे नाव पुढे आले आहे. एक काळ असा होता की, दाऊद- मंदाकिनीचे नाव एकत्र जोडले गेले. यावरुन अनेक वावटळ देखील उठली. परंतु पुढे याचे काहीही झाले नाही. दाऊदसोबतची ही जवळीक मंदाकिनीला मात्र चांगलीच भोवली. करिअरच्या ग्राफमध्ये उंचावर जात असताना अचानक तिला काम मिळणे बंद झाले. दरम्यान, याची लव्हस्टोरी काय होती ती आपण आज जाणून घेऊया.
… आणि दाऊद पडला प्रेमात

धबधब्याखाली आंघोळ करणारी मंदाकिनी आजही अनेकांच्या लक्षात आहे. 1987 साली आलेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील त्या सीनने मंदाकिनीचे सगळ्यांना वेड लागले. त्या काळात इतका बोल्ड सीन देणाऱ्या मंदाकिनीच्या रुपाची चर्चा होऊ लागली. याच चित्रपटातून राज कपूर यांचे देखील पदार्पण झाले. पण मंदाकिनी सगळ्यांचाच लक्षात राहिली. आता तिच्या करिअरच्या बाबतीत कसलीही चिंता नव्हती. तिला विविध चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या. तिने करिअरचे उच्चांक असे टोक गाठले होते. त्याकाळात बॉलिवूडसोबत असलेले दाऊदचे नातेही काही नवीन नव्हते. अनेक मोठ्या कलाकारांसोबत त्याचे संबंध होते. अनेक सेलिब्रिटींना तो खास भेटायला देखील बोलावत असे. त्याच्या दहशतीमध्ये संपूर्ण बॉलिवूड होते.
ती एक भेट आणि करिअर संपले

मंदाकिनीचे करिअर अगदी उत्तम सुरु होते. पण त्या एका फोटोनंतर मात्र तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. 1994 साली तिचा दाऊदसोबत एक फोटो चांगलाच व्हायरल झाला. दाऊद इब्राहिमच्या शेजारी बसलेली मंदाकिनी पाहून अनेकांना धक्का बसला. काही कारणास्तव ज्यावेळी मंदाकिनी शारजाहला गेली होती. त्यावेळी दाऊदची तिच्यावर नजर पडली आणि त्याचक्षणी तो तिच्या प्रेमात पडला. असा उल्लेख दाऊदवर लिहिण्यात आलेल्या पुस्तकात करण्यात आलेला आहे. दाऊदने तिची भेट घेतली आणि या दोघांमध्ये प्रेम सुरु झाले. तिचा हाच फोटो तिच्या करिअरसाठी घातक ठरला. कारण 1993 साली जे साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले त्यामध्ये दाऊदचा हात होता हे सिद्ध झाले होते. असे असताना अशा व्यक्तिसोबत मंदाकिनी असते ही भीती सगळ्यांच्या मनात बसली. मंदाकिनीला काम मिळणे बंद झाले. दाऊदने अनेकदा तिला काम मिळण्यासाठी वेगवेगळ्या निर्मात्यांना धमकी देखील दिल्याचे सांगितले जाते. इतकेच काय तिच्यासाठी तो स्वत:च्या पत्नीला देखील सोडायला तयार झाला होता, असे देखील सांगितले जाते.
मंदाकिनीने दिला नकार
एका फोटोमुळे करिअर बरबाद झाल्यानंतर मंदाकिनीच्या मुलाखती अनेक ठिकाणी घेतल्या गेल्या. तिला दाऊद आणि तिच्या नात्याविषयी विचारण्यात आले. पण प्रत्येकवेळी तिने या नात्याला विरोध केला. दाऊद आणि तिच्यामध्ये केवळ मैत्री होती. या मैत्रीपोटीच ती त्याला भेटली. पण त्यांच्यात कोणतेही नाते नव्हते असे तिने वारंवार सांगितले. पण तरीही तिच्यावरुन कधीही संशयाची सुई काही केल्या हलली नाही. असे देखील सांगितले जाते की, दाऊद आणि तिला एक मुलगा आहे जो मंदाकिनीच्या कोणा नातेवाईकाकडे वाढला आहे. पण याबाबत कोणताही ठोस असा पुरावा नाही.
मंदाकिनीने केले लग्न

मंदाकिनीने नंतर सर्वसामान्य लग्न करुन सुखी संसार देखील केला. तिला दोन मुली आणि एक मुलगा असून ती आता छोटी मोठी काम करते.
पण त्या एका फोटोनंतर मंदाकिनीचे नाव पूर्णपणे खराब झाले यात काहीही शंका नाही.