महाराष्ट्राच्या राजकारणात रोजच नवीनवीन घडामोडी घडताना दिसत आहे. आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे चर्चा करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते हे देखील भेटणार असल्याची माहिती मिळत आहे.
यामागे काही खास कारण असल्याचे देखील कळत आहे. ते असे की, बाळासाहेब ठाकरे यांच्या अमूल्य अशा भाषणांचा ठेवा हा राज ठाकरे यांच्याकडे आहे. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी त्या काळात ग्रामोफोनमध्ये बाळासाहेबांची भाषण ही संग्रहित करुन ठेवली आहे. ही भाषण 1966 पासून ते 1990 पर्यंतची आहेत. हा अमूल्य ठेवा ठाकरे घराण्यासाठी फारच खास आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम करत असताना त्यांची ही भाषणं ही देखील तितकीच महत्वाची असणार आहेत. यासाठीच उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना फोन करणार असल्याचे सांगितले जात आहे.
उद्धव ठाकरे फोन उचलत नाही
एकीकडे या उद्धव- राज यांच्यामध्ये काहीतरी चर्चा घडून येईल असे वाटत आहे. पण दुसरीकडे मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र यांनी सांगितले की, जे इतरांचे फोन उचलत नाहीत अशांच्या मनात या गोष्टी येतात. राज ठाकरे अगदी साध्या कार्यकर्त्याचाही फोन उचलतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांचा फोन उचलला जाणार नाही असा विचार अजिबात करु नये. या पूर्वी 2017 साली यागोष्टीवर प्रस्ताव देण्यासाठी फोन करण्यात आला पण त्यांनी तो उचलला नाही. आता शिवसेना ठाकरे गटासोबत युती करायची की नाही हा निर्णय राज ठाकरे घेतील.
दरम्यान, युती करण्याबाबत तरी या दोघांनी नकारच दिला असल्याचे दिसत आहे.