शाळाबाह्य मुलांची संख्या ही अद्यापही आटोक्यात येताना दिसत नाही. विशेषत:मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच चक्क सर्वाधिक शाळाबाह्य मुले असल्याचे दिसून आले आहे. ठाण्यात होणाऱ्या चांगल्या बदलांमध्ये शाळाबाह्य मुले अजूनही असणे ही खरंच चिंताजनक अशी बाब आहे. शालेय शिक्षणमंत्र्यांना यासंदर्भात दखल घ्यावी यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी लिखित निवेदनात याचा खुलासा केला आहे. यामध्ये ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात खूप मोठ्याप्रमाणात शाळाबाह्य मुले असल्याचे दिसून आले आहे.
शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार 1510 मुले ही शाळाबाह्य होती. यात 742 मुलांचा आणि 768 मुलींचा समावेश आहे. यानुसार मुंबईत 164, ठाण्यात 380, रायगडमध्ये 38 तर पालघरमध्ये 928 मुले ही शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर शिक्षण विभागाकडून तब्बल 582 विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले. तरीही 932 मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून आले आहे. यातील कित्येक मुलांना शाळेत दाखल केले आहे. तरी देखील एक मोठा आकडा मुलांना शाळेपासून वंचित ठेवत असल्याचे दिसत आहे. सदर विद्यार्थ्यांची रितसर आधार नोंदणी नसल्याने आणि काहींची माहिती चुकीची असल्याने त्यांची नावे पटसंख्येत नसल्याची भीती आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रवाहात आणण्यासाठी काय करण्यात आले आहे असे प्रश्न शिक्षणमंत्र्यांना विचारण्यात आले आहेत.
यावर शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी उत्तराच्या दाखल्यात आतापर्यंत शाळेत दाखल झालेल्या मुलांचा आकडा सांगितला आहे. शिक्षण विभागातर्फे राबवण्यात आलेल्या मोहिमेनुसार अनेक विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात यश मिळाले आहे आणि अद्याप जे विद्यार्थी शाळाबाह्य आहेत त्यांना शाळेत दाखल करुण घेण्याची प्रकिया सुरु असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.