Suchana Seth आपल्या मुलाचा खून करुन त्याला बॅगेत भरुन गोव्यातून बँगलोरला फरार होणार होती. तोच पोलिसांना काहीतरी अघटीत घडल्याचा संशय आला आणि तिला योग्यवेळी पकडण्यात पोलिसांना यश आले. एका स्टार्टअप कंपनीची सीईओ, उच्च शिक्षित अशी महिला आपल्याच मुलाला अशी मारुन बॅगेत भरुन नेऊ शकते यावर सुरुवातीला कोणालाच विश्वास होईना. परंतु खून करुन तिनेच त्याचा बॅगेत भरल्याचे कबुल केले होते. त्यामुळे हे करण्यासाठी ती कोणत्या मानसिक तणावाखाली तर नव्हती ना? असा संशय पोलिसांना होता. त्यानुसार तिच्या काही वैदकीय चाचण्या देखील करण्यात आल्या. त्यामध्ये ती कोणत्याही मानसिक आजाराने ग्रासलेली नाही असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तिने केलेला हा खून अत्यंत विचारपूर्वक आणि प्लॅनिंग करुन केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मानसिक स्थिती चांगली
अनेकदा अशा काही घटना घडल्यानंतर त्यासाठी काही ताण कारणीभूत होता का? हे तपासले जाते. कारण वैवाहिक जीवनातील काही समस्या, नातेसंंबंधांमधील बिघाड यामुळे खूप वेळा अशा घटना घडतात. सूचना ही त्याच्या नवऱ्यासोबत राहात नव्हती. त्याचा घटस्फोट झाला होता. केवळ मुलाला भेटण्यासाठी सूचनाच्या नवऱ्याला एक दिवस देण्यात आला होता. पहिल्याच दिवशी तिने त्याला भेटता येऊ नये या आधीच आपल्या मुलाला मारले. आता या साठी तिची मानसिक स्थिती जबाबदार आहे का? हे पाहण्यासाठी काही चाचण्या केल्यानंतर ती अगदी सुस्थितीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिने सगळ्या प्रश्नांची उत्तरे अगदी योग्य दिली आहेत. त्यामुळे तिची मानसिक स्थिती खराब होती असे अजिबात म्हणता येणार नाही. त्यामुळे मानसिक स्थितीचे कारण देऊन तिची काही केल्या सुटका होणार नाही असे देखील सांगण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
8 जानेवारी रोजी गोव्याच्या एका हॉटेलमधून चेक आऊट करणाऱ्या सूचना सेठवर हॉटेलमधील स्टाफला संशय आला होता. ती 4 वर्षाच्या मुलासोबत येथे राहायला आली होती. पण चेक आऊट करताना तिच्यासोबत तो मुलगा नव्हता. विचारणा केल्यावर तिने मुलाला गोव्यात एका नातेवाईकाकडे सोडले आहे असे सांगितले. त्यामुळे तिची तेथून काही काळासाठी सुटका झाली. तिने गोवा ते बँगलोर असा मोठा प्रवास गाडीने करायचा ठरवला. तिने त्यासाठी ड्रायव्हरला मोठी रक्कम देण्याचे देखील कबूल केले. तिने त्याला सामान भरण्यास सांगितले. तिची बॅग ही थोडी जास्तच जड होती. त्यामुळे ड्रायव्हरने तिला हटकले देखील. त्यावेळी त्याला त्यात दारु असण्याचा संशय आला. परंतु आत बॉडी आहे हे त्याला माहीत नव्हते. गाडीत बसल्यानंतर कोणाशी काहीही न बोलता ती निघाली. हॉटेलवाल्यांनी रुम आवरायला घेतल्यानंतर तिच्या रुममध्ये त्यांना रक्ताचे डाग दिसले. त्वरीत स्टाफने याची माहिती दिल्यामुळे पोलिस आले. पोलिसांनी लगेचच सूचनाला घेऊन जात असलेल्या ड्रायव्हरला फोन केला आणि त्याला नजीकच्या पोलिस स्टेशनला घेऊन जाण्यास सांगितले. तेथे गेल्यानंतर सूचनाची चौकशी करण्यात आली. तिचे सामान तपासण्यात आले. तिच्या सामानात पोलिसांना तिच्या 4 वर्षाच्या मुलाचे शव मिळाले आणि सगळा प्रकार समोर आला.
सध्या सूचना ही कारावासात असून तिने मानसिक स्थितीचे कारण देत पुन्हा एकदा कोर्टात अपील केले आहे. त्यावरील सुनावणी याच महिन्यात होणार आहे.