गणेशोत्सव अगदी काहीच दिवसावर येऊन ठेपला आहे. पर्यावरणपूरक असा हा सण व्हावा यासाठी काही खास पाऊले महापालिकेकडून उचलण्यात आली आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती आणि अन्य मूर्ती यांमधील फरक लोकांना कळावा यासाठी यावर एक खास शिक्का मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण गणेशोत्सव हा आस्थेचा विषय आहे. लोकांची आस्था जाणून घेत बाप्पाच्या मूर्तीवर शिक्का मारणे हे मान्य नसल्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.
बाजारात विविध प्रकारच्या गणेश मूर्ती मिळतात. काही गणेश मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मिळतात. त्या पर्यावरणपूरक नसतात. अशावेळी शाडूच्या मातीच्या किंवा मातीच्या मूर्ती हे ही अनेक जण घेणे पसंत करतात. अशावेळी ज्या मूर्ती पर्यावरणपूरक आहेत यावर शिक्का मारावा असे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यावर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आक्षेप घेत महापालिका आयुक्त एक्बाल सिंह चहल यांना पत्राद्वारे विनंती करुन शिक्क्याऐवजी दुसरे काहीतरी करावे अशी विनंती केली आहे.
लोढा पुढे म्हणाले की, बाप्पा हा समस्त हिंदू धर्माच्या आस्थेचा विषय आहे. मुंबईत या उत्सवाचे विशेष महत्व आहे, प्रत्येक व्यक्ती गणेशाच्या मूर्तीला पवित्र मानून त्याची मनोभावे पूजा करतो. त्यामुळे उत्सव काळात कोणाच्याही श्रद्धेला धक्का लागणार नाही याची बारकाईने काळजी घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर मूर्तींवर शिक्का मारणे किंवा रंग देणे योग्य नाही! यामुळे लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा यासाठी मूर्तीवर कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी किंवा शिक्केबाजी नको, त्याऐवजी दुसरा पर्याय शोधण्याबाबत मी स्वतः महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याशी बोललो आहे.” असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.