मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. या सर्व लोकसभा मतदारसंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघाची माहिती महाविकास आघाडी व महायुतीतील सद्यस्थिती पक्षाच्या वरिष्ठांच्या समोर मंडळी.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेतले काही लोक जरी विद्यमान सरकार मध्ये सामील झाले असले तरी मतदार महाविकास आघाडी सोबतच आहे असा विश्वास आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला. वाढती बेरोजगारी, कंत्राटी पद्धतीच्या सरकारी नोकऱ्या, सरकारी शाळांबाबतचे धोरण, महागाई इत्यादी ह्या सर्व विषयांमुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या मनात विद्यमान सरकार बाबत नाराजी पसरली असल्याचे कार्यकर्त्यांनी पवार साहेबांना बोलून दाखविले.
पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना शरद पवार यांनी विद्यमान सरकारच्या अपयशांचा पाढा वाचून दाखवला तसंच या सरकारचे अपयश जनतेसमोर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे मांडले पाहिजे अशी सूचनाही केल्या. आघाडीतील जागा वाटप लवकरच होईल व पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याकरिता जिद्दीने कामाला लागलं पाहिजे असा आदेश पवार साहेबांनी पदाधिकाऱ्यांना दिला. पक्ष जो उमेदवार देईल त्याला आम्ही निवडून आणू अशी गवाही राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना दिली.
आजच्या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या सोबत राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार श्रीनिवास पाटील, आ. एकनाथ खडसे, आ. जितेंद्र आव्हाड, आ.बाळासाहेब पाटील आ. अनिल बाबू देशमुख, आ. अशोक पवार, कोषाध्यक्ष श्री हेमंत टाकले, विद्याताई चव्हाण, रवींद्र पवार, बसवराज पाटील, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजपुरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.