मुंबई – स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या महिला आघाडीच्या रणरागिणी आणि उबाठा गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचा पक्षप्रवेश हा उबाठा गटाला मोठा धक्का मानला जात असून आमदार, खासदारांच्यानंतर आता नेते मंडळींनी देखील शिवसेनेची वाट धरली असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसू लागले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेमध्ये गेली 45 वर्षे कार्यरत असलेल्या आणि प्रत्येक आंदोलनात हिरीरीने सहभागी होत असलेल्या, शिवसेनेची महिला आघाडी स्थापन करून ती गावागावात पोहचवलेल्या आणि शिवसेनेची रणरागिणी अशी ओळख निर्माण केलेल्या मीना कांबळी यांनी उबाठा गटाची साथ सोडून आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या काळात शिवसेनेच्या गटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, आणि अखेर उपनेत्या अशी चढत्या क्रमाने त्यांनी अनेक पदे मिळवली होती. मात्र आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे याना अभिप्रेत असलेली शिवसेना तळागाळात पोहचवण्याचा निर्धार करून त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना मीना कांबळे म्हणाल्या की, स्वर्गीय बाळासाहेब आणि मासाहेब यांच्यासोबत एवढी वर्षे काम करता येणे हे आपले सौभाग्य होते. त्यांनी आदेश दिल्यावर आंदोलनात उडी घेताना कधीच माघार घेतली नाही त्यामुळेच साहेब मला शिवसेनेची रणरागिणी म्हणायचे. मात्र गेल्या काही वर्षात बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले काम सुरू नसल्यासारखे वाटत होते. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काही वादळे आली, त्याबद्दल देखील वेळोवेळी पक्षनेतृत्वाला कल्पना दिली पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी एकत्र काम केलेले असल्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत मला चांगली माहीत आहे. त्यामुळे आता यापुढे त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करून शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी त्यांचे पक्षात स्वागत केले. तसेच त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षभरात सर्वसामान्य लोकांसाठी निर्णय घेतले असून त्यामुळे प्रभावित होऊन मंत्री, खासदार, आमदार आणि असंख्य पदाधिकारी शिवसेनेमध्ये आले. मात्र आता मीना ताईंचा रूपाने उपनेत्यांनीही शिवसेनेची वाट धरली असल्याचे सांगितले. राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून विकासकामातील अडथळे दूर केले. वैयक्तिक इगोमुळे रखडवलेले उद्योग, मेट्रो, विकासकामे यातील सगळे अडथळे दूर केले. घरात बसून लोकांसाठी काम करता येत नाही त्यासाठी लोकांना प्रत्यक्ष भेटावे लागते. आता ओरिजिनल धनुष्यबाण असलेली शिवसेना आपली असून पदाच्या किंवा सत्तेच्या लालसेसाठी नव्हे तर पक्ष वाचवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला होता असे निक्षून सांगितले. महिला आघाडी सर्वदूर पोहचवणाऱ्या रणरागिणी आज आपल्यासोबत आल्या आहेत. त्यांच्या रूपाने आपल्याला महिलांचे हे संघटन गावागावात निर्माण करायचे आहे. महिलांसाठी या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. एसटी भाड्यात 50 टक्के सूट देणे असो, महिलांना मालमत्ता खरेदीसाठी स्टॅम्प ड्युटी मध्ये १ टक्के सवलत देणे असो, महिला सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटांना प्रोत्साहन देणे असो, बचत गटांच्या रिव्हॉविंग फंड 15 चा 30 हजार करणे असो, लेक लाडकी सारखी योजना असो असे अनेक उपक्रम राबवले आहेत. आपण सगळे मिळून महिलांपर्यंत हे सारे निर्णय पोहचवू. एक टीम म्हणून एकत्र काम करू असे शिंदे यांनी स्पष्ट केले. आपण गेलो की उद्या काहीजण म्हणतील कचरा गेला म्हणून, आम्ही सगळे गेलो तेव्हा पण हेच म्हणाले होते. पण जेव्हा तिकडचे सगळेच प्रमुख पदाधिकारी इथे येतील तेव्हा तिथे उरेल तो काय असेल याचा विचार करून ठेवावा असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका करण्याऱ्याना लगावला. त्याना टीका करू द्या आपण टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देऊ असे त्यांनी सांगितले.
पक्षप्रवेश करताच मुख्यमंत्र्यांनी सोपविली मोठी जबाबदारी
मीना कांबळी यांची शिवसेना महिला नेत्या म्हणून नियुक्ती शिवसेनेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीना कांबळी यांची शिवसेना महिला नेतेपदी नियुक्ती जाहीर केली. तसेच शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवण्यासाठी काम सूरु करावे असेही त्याना सांगितले. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता हा मुख्यमंत्री आहे असेच समजून शिवसेनेचा विचार सर्वदूर पोहचवण्यासाठी त्यांनी काम करावे असे शिंदे यांनी सांगितले.