Navi Mumbai Metro मुंबई- नवी मुंबई- मुंबई उपनगर -ठाणे अशा विविध ठिकाणी राहणाऱ्या लोकांना मुंबईत अगदी सहजगत्या प्रवास करता यावा यासाठी सध्या अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. दिल्लीप्रमाणेच वेगवेगळ्या ठिकाणांना जोडणाऱ्या या मेट्रो प्रवासासाठी अगदी सोयीस्कर अशा होणार आहेत. पुढील काळात याचे काम पूर्ण देखील होईल. पण सध्या नवी मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो रुजू झाली आहे. तळोजा-पेंधरवरुन ही मेट्रो सुटणार असून सध्या तिचा शेवटचा थांबा हा बेलापूर असणार आहे.
नवी मुंबईत जाण्यासाठी ट्रान्स हार्बर किंवा वेस्टर्न रेल्वेवरुन काही गाड्या सोडल्या जातात. पण त्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत. पुढील काळात मेट्रोचे जाळे अधिक झाल्यानंतर नवी मुंबईत जाणे सहज शक्य होणार आहे. सध्या नवी मुंबई मेट्रोचा हा प्रकल्प बेलापूर स्थानकापर्यंत धावणार आहे. अखेर 12 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ही सेवा सुरु झाल्यामुळे नवी मुंबईकरांना त्याचा फायदा होणार आहे. 11 किलोमीटर प्रवासाचा रुट असून यामध्ये 11 स्टेशन्स बनवण्यात आले आहेत. सकाळी 6 ते 10 या वेळामध्ये मेट्रो सेवा सुरु राहणार असून दर 15 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असणार आहेत.
औपचारिक उद्धाटन नाही
नवी मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात यावे अशी सिडकोची इच्छा होती. पण वेळेचे गणित न बसल्यामुळे मोदी यांना याचे उद्धाटन करणे शक्य होत नव्हते. अखेर कोणत्याही औपचारिक उद्धघाटनाशिवायच ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
अनेक सुविधांनी युक्त
नवी मुंबईच्या या मेट्रो रेलच्या प्रत्येक स्थानकावर अनेक सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. वातानुकुलित कोचशिवाय दिव्यांग पार्किंग, रिक्षा स्टँड, स्टॉल, डिझल जनरेटर अशाही सोयी देण्यात आलेल्या आहेत.
तर आजपासून नवी मुंबईकरांना याचा लाभ घेता येणार आहे.