राज्यातील महिला सशक्तीकरण अभियानाला येत्या शुक्रवारपासून राज्यात सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याची सुरुवात झाली असून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी ‘नारी शक्ती दूत’ या ॲपची घोषणा करण्यात आली आहे. यातून महिलांना राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना, महिलांसाठीच्या विविध घोषणा आणि उपक्रमांची माहिती या माध्यमातून महिलांपर्यंत पोहचविण्याचा महिला व बालविकास विभागाचा हेतू आहे. या अॅपच्या माध्यमातून गरजू महिलांपर्यंत कोणत्या योजना लागू होतील, त्यासंदर्भातील माहितीही मिळवता येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी सांगितले.
काय वक्तव्य करावे याचे भान आव्हाडांना राहिलेले नाही – आदिती तटकरे यांचे टीकास्त्र
या अॅपच्या माध्यमातून राज्यातील महिलांना त्यांच्यासंदर्भातील विविध योजनांची माहिती नोटिफिकेशन आणि इतर माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. त्याशिवाय महिलांसाठीच्या योजनांच्या विविध बातम्यांची माहितीही यावेळी पोहचविली जाणार आहे. यात फक्त महिला व बालविकास विभागाच्या योजनाच नाही तर विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महिलांसाठीच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. या अॅपमध्ये या विविध योजनांसाठीच अर्ज करण्याची सुविधाही पुरविण्यात येणार असून त्याची अर्जाची रितसर माहितीही लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. या अर्जांची माहिती गोळा करण्यासाठी जिल्हा जनकल्याण कक्षाकडे पुरविण्यात येणार असून त्यानुसार त्या अर्जावर कारवाई करणे अधिक सोप्पे होणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. या अॅप आणि वेबपोर्टलसाठी विशेष डॅशबोर्डसुद्धा तयार करण्यात आला असून अंड्रॉईडबेस मोबाईलवरच सध्या हा अॅप असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्य सरकारतर्फे राज्यातील महिलांसाठी विविध योजना आणि प्रकल्प दरवर्षी राबविण्यात येतात. यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधीही खर्च होतो. महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या या विविध योजना नेमक्या काय आहेत, त्याची पात्रता काय यासारख्या अनेक प्रश्नांमुळे बऱ्याच योजना महिलांपर्यंत पोहचत नसल्याची तक्रार महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या सूचनेनुसार नारी शक्ती दूत हे अॅप तयार करण्यात आले आहे.