जूनच्या शेवटापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांना चांगलाच आनंद झाला होता. जून-जुलैमध्ये इतका पाऊस पडला की, अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली. पण आता शेतकऱ्याना पावसाची गरज असताना पाऊसाने मात्र विश्राम घेतला आहे. सध्या पावसाचे दिवस सुरु असताना पावसाने घेतलेला ब्रेक अनेकांसाठी काळजीचे कारण बनला आहे. पण हवामान खात्याने दिलासा देणारी बातमी दिली आहे. मान्सूनला लागलेला ब्रेक या कालावधीनंतर उठणार असून पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या 18 ऑगस्टपासून पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. त्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या दिवसात म्हणजेच 25 ते 31 ऑगस्ट या काळातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, कोकण या ठिकाणी महिन्याच्या अखेरीस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी पाऊस हा सरासरी असेल तर काही ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा आलेले बिपरजॉय चक्रीवादळ हे देखील पावसाच्या ब्रेकसाठी कारणीभूत ठरले. 8 जूनला पाऊस केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर 11 जूनला रत्नागिरीत दाखल झाला. त्यानंतर मान्सून थंडावला. पुन्हा जुलै महिन्यामध्ये तो सक्रिय झाला. पण ऑगस्ट महिन्यात म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही.
ज्या ठिकाणी शेतीसाठी पावसाची आवश्यकता आहे .तेथे पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पाऊस कधी पडेल असा प्रश्न पडला आहे. मुंबई आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरु आहे. पण म्हणावा तितका पाऊस हा काही पडला नाही.
आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे.