ठाणे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयात आज तब्बल 16 रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. ही बातमी ऐकून अनेकांना महापालिका रुग्णालयाबद्दल धक्का आणि भिती वाटू लागली आहे. एकाच दिवशी इतक्या रुग्णांचा मृत्यू हा उपचारादरम्यान झाल्याचे कळ आहे. या बातमीनंतर सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या रुग्णालयाच्या डीन डॉक्टरांनी या मागील कारण देखील सांगितले आहे.
आज सकाळी ( १३ ऑगस्ट) सकाळी ठाणे महापालिकांतर्गत येणाऱ्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 16 रुग्णांचा मृत्यू झाला ही बातमी आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पालिका रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासदंर्भात हयगय गेली जाते अशी चर्चा होऊ लागली. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष आक्रमक झाले. पण आता रुग्णालयाचे डीन डॉ. राकेश बारोट यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, रुग्णालयात 16 रुग्णांचे मृत्यू एकाच दिवशी झाले ही गोष्ट जरी खरी असली तरी देखील हे 16 रुग्ण वेगवेगळ्या कारणांमुळे दगावले आहेत. यात एका 4 वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. त्याने रॉकेल प्यायले होते. त्यामुळे त्याला वाचवता आले नाही. या शिवाय अन्य काही रुग्ण काही दिवसांपासून उपचार घेत होते. काही जणांनी उपचार घेण्यासाठी फारच उशीर केला. काही जणांना काही दीर्घ आजार ही होते. एका रुग्णाचा मृत्यू हा डोक्याला मार लागल्यामुळे झाला. दोन रुग्णांची फुफ्फसे खराब होऊन त्यांचा मृत्यू झाला. काही रुग्ण हे मल्टी-ऑर्डर डिस्फंक्शनमुळे दगावले. या सगळ्या रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले.पण त्यांना वाचवण्यात यश आले नाही. असे डॉक्टर बारोट यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, रुग्णालय हे 500 खाटांचे आहे. आम्ही क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण घेतो. काही रुग्ण हे गरीब आणि वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेले असतात. त्यांच्यावर आम्ही उपचार करतो. काही रुग्ण हे उपचार घेण्यासाठी लवकर येत नाहीत. त्यामुळेही उपचार करणे कठीण जाते.डॉक्टर 24 तास रुग्णांच्या सेवेत असतात.
एकाच दिवशी 16 रुग्णांचा मृत्यू ही तरीही चिंतेची बाब आहे. रुग्णांनी योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.