New year आपल्या चुका टाळण्याची संधी आपल्याला कायम मिळत असते. परंतु कधीकधी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. या नव्या वर्षात तुम्ही चुका होणार नाही याची काळजी तर घ्याच पण शिवाय या नव्या वर्षात तुम्ही केलेल्या कोणत्या चुका टाळायला हव्यात ते आज आपण जाणून घेऊया. जेणेकरुन या नव्या वर्षात तुम्हाला गेल्यावर्षी केलेल्या चुकांचे बॅगेज घेऊन पुढच्यावर्षात पाय ठेवण्याची काहीही गरज नाही. आज 2023 चे सरते वर्ष आहे या सरत्या वर्षातील चुका टाळण्यासाठी या गोष्टींचा विचार नक्की करा.
नात्यातील गुंतागुंत
जर तुमच्या एखाद्या नात्यातील गुंतागुंत काही केल्या सोडवता येत नसेल तर आजच्या या शेवटच्या दिवशी त्याचा सारासार विचार करुन योग्य तो निर्णय घ्या. कारण नात्यातील गुंतागुंत कधीही न संपणारी असते. पण जर तुम्ही अशा एखाद्या नात्यात आहात ज्या नात्याचे ना काही भविष्य आहे ना वर्तमान अशा नात्यातून तुम्हाला योग्य पद्धतीने बाहेर पडणे केव्हाही चांगले. त्यामुळे जर एखाद्या नात्यात तुम्ही अजिबात आनंदी नाही आणि कधी व्हाल अशीही अपेक्षा नाही ते नाते योग्यवेळी योग्यपद्धतीने संपवणे केव्हाही चांगले.
एखाद्यावरचा राग
आपल्या मनाविरुद्ध एखादी व्यक्ती वागली असेल तर त्याचा राग आपण खूप वेळा आपल्या मनात ठेवतो. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का? की असा राग मनात ठेवून केवळ तुमचेच नुकसान होत असते. कारण त्या गोष्टींचा सतत विचार तुम्ही करत राहता. त्यामुळे त्या व्यक्तीचे कमी तुमचे नुकसान जास्त होते. तुम्ही तुमचा जास्त वेळ हा याचा विचार करण्यात घालवता जे चांगले नाही. म्हणूनच जर तुम्हाला एखाद्यावर राग असेल तर तुम्ही तो राग रुसवा, लोभ सगळे काही विसरा आणि नाते पूर्ववत नाही किमान सुरळीत करण्याचा प्रयत्न करा.
नकारात्मक विचार
नकारात्मक विचारांनी आपल्यापैकी अनेकांना ग्रासलेले आहे. म्हणूनच नैराश्य अनेकांच्या वाट्याला आलेले आहे. नकारात्मक विचार हे केवळ तुमचे नुकसान करण्यासाठी असतात याचा एकदा तरी विचार करा. ते केवळ तुमच्यामधील नकारात्मकता वाढवतात. हे विचार येण्यासाठी तुमच्याकडे असलेला फावला वेळ कारणीभूत असतो. म्हणूनच काहीतरी चांगली सवय लावा. ज्यात तुमचा जास्तीत जास्त वेळ जाईल आणि तुम्हाला असा विचार करायला वेळ मिळणार नाही.
धरसोडवृत्ती
नवे वर्ष येणार म्हटल्यावर आपण नवे नवे संकल्प करायला सुरुवात करतो. पण ते पूर्ण करता येत नाही याचे कारण असे की, आपल्या सगळ्यांमध्ये धरसोडवृत्ती असते. एखादी गोष्ट करायची ठरवली पण ती आता जमत नाही असे अनेकदा होते. असे जर तुमच्या बाबतीत कायम घडत असेल तर असा विचार का की, तुम्हाला एकतर काहीतरी ठरवायचे आहे किंवा काहीही ठरवू नका जसे जमेल तसे तुम्ही काम करत राहा. म्हणजे तुम्हाला त्याचा ताण येणार नाही.
आरोग्याकडे दुर्लक्ष
हेल्थ इज वेल्थ आरोग्य असेल तर तुमच्या हातात सगळे काही आहे जर ते नसेल तर तुम्हाला काहीही करता येणार नाही. खूप जण आजही आपल्या आरोग्याकडे म्हणावे तितके लक्ष देत नाही. अशावेळी तुम्ही आरोग्याच्या कोणत्या तक्रारी तुम्हाला आहेत आणि त्यावर काय करता येईल याकडे योग्य असे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला नवीनवीन गोष्टी या वर्षात अगदी सहज करता येतील.
मग या नव्या वर्षात तुम्ही काही चुका नक्की टाळा