राज्य विधीमंडळातील विविध पक्षाचे प्रतिनिधीत्त्व करणारे 22 सदस्य गुरुवारपासून जर्मनी, नेदरलँड आणि यु.के.च्या अभ्यास दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या दौऱ्यात 3 युरोपीय देशांना सदस्य भेट देणार असून यात 6 अभ्यास भेटी आणि विविध बैठकांचा समावेेश आहे. मुख्य म्हणजे, यावेळी हे सर्व सदस्य राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत. या परदेश अभ्यास दौऱ्याला परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, यांची मान्यता असून या अभ्यास दौऱ्याचे नेतृत्व विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे करणार आहेत. या अभ्यास दौऱ्यात एकूण 11 महिला सदस्यांचा समावेश आहे.
या अभ्यास दौऱ्याची अधिक माहिती देताना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सांगितले की, या अभ्यास दौऱ्यात प्रारंभी फ्रॅंन्कफर्ट येथे सामाजिक, सांस्कृतिक तसेच कृषी आणि दुग्धउत्पादन क्षेत्रातील तज्ञांबरोबर तसेच भारताचे उच्चायुक्त यांच्यासमवेत बैठक होईल. त्याचप्रमाणे जर्मनीत स्त्री-पुरुष समानतेसाठी कार्य करणाऱ्या अभ्यासगटाबरोबर चर्चा-संवाद आयोजित करण्यात आला आहे.
त्याचबरोबर या अभ्यास दौऱ्यात ॲमस्टरडॅम येथे देखील नेदरलॅंडच्या विविध क्षेत्रातील तज्ञांबरोबर तसेच संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच सदस्यांसोबत अभ्यासभेट, चर्चा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी भारताचे नेदरलॅंडमधील राजदूत यांचीही अभ्यासभेटीवरील सदस्य भेट घेणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे लंडन येथे देखील भारताचे लंडनमधील उच्चायुक्त, संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच, लंडन, लंडनमधील मराठी मंडळाचे पदाधिकारी, यु.के. पार्लमेंट मधील राष्ट्रकुल संसदीय मंडळ मुख्यालय आणि महासचिव यांच्या समवेत देखील अभ्यासभेट आयोजित करण्यात आली असल्याची माहिती निलम गोऱ्हे यांनी दिली.
