Kurla Murder | रविवार (19 नोव्हेंबर ) सगळा देश भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये व्यस्त होता. त्यातच मुंबईच्या कुर्ला परिसरात एक धक्कादायक असा प्रकार घडला आहे. शांतिनगर येथे एक संशयास्पद सुटकेस सापडली. आजुबाजूच्या लोकांनी पोलिसांना याची माहिती देताच घटनास्थळी पोलिस आले त्यांनी बॅग उघडली असताना त्यांना त्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह दिसला. हा मृतदेह कोणाचा याची अद्याप ओळख पटलेली नाही.
कुर्ला हा परिसर कायमच गजबजलेला असतो. पण हल्ली मेट्रोच्या कामांमुळे अनेक ठिकाणी गर्दी कमी झालेली आहे. कुर्ल्यामध्ये मेट्रोचे काम सुरु झाल्यापासून तर मेट्रोच्या आसपासची वस्तीही कमी झालेली आहे. रविवारी वर्ल्ड कपच्या सामन्यामुळे अशीही गर्दी कमी होती. त्याचाच फायदा घेऊन कोणीतरी हा मृतदेह असलेली बॅग मेट्रोचे काम सुरु असलेल्या ठिकाणी ठेवली.दुपारी 1 वाजता पोलिसांनी घटनास्थळी येेऊन तपासणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला ही साधारण 25-35 वर्षांदरम्यानची आहे. तिच्या अंगावर टी शर्ट आणि ट्रॅक पँट म्हणजेच घरातले कपडे दिसत आहे. ही बॅग कोणी ठेवली याचा शोध सुरु आहे. त्यासाठी पोलीस आजुबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहे. अज्ञात गुन्हेगारावर खून आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतदेह हा घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या यावर क्राईम ब्रँच अधिक तपास करत आहे.