जी स्त्री काही कारणाने व्यंधत्वाचा सामना करत आहे , अशा स्त्रीला आपल्या समाजात अनेक त्रासाला सामोर जावं लागतं. त्याचबरोबर प्रत्येक मासिक पाळी बरोबर येणारं दडपण मानसिक ताण आणखी वाढवत असतं , या वेळी पती पत्नी मध्ये उत्तम समन्वय असणं खूप गरजेचं आहे. या ताणामुळे काही स्त्रिया या उदासीन होतात व काही नैराश्याने ग्रासल्या जातात. डॉ. करिश्मा डाफळे, वंधत्व निवारण तज्ज्ञ, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
योग्य सहकार्य महत्त्वाचे

प्रत्येक व्यक्तीला पालकत्व कधी स्वीकारावं याचा अधिकार व स्वातंत्र्य असायला हवं. यासाठी घरच्यांनी व समाजाने त्यांना योग्य सहकार्य करायला हवं. हे सर्व करत असताना त्यांनी योग्य असा वैद्यकीय सल्ला घ्यावा. याला गर्भधारणेपूर्व समुपदेशन असे म्हणतात. आई होण्याची योग्य वेळ कोणती हे ठरवताना एक गोष्ट महत्वाची ठरते ते म्हणजे ओव्हेरियन रिझर्व्ह किंवा अंडकोषातील स्त्रीबीजांची संख्या. सामान्यतः पस्तीशीनंतर ही संख्या व त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते.
जोडीदाराने समजून घ्यावे
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या भावना, भीती आणि अपेक्षांबद्दल खुलेपणाने चर्चा करा. तुमच्या जोडीदाराच्या विचारांचा आदर करा. प्रत्येक चांगल्या वाईट वेळांमध्ये तुम्ही एकमेकांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. या प्रवासात तुम्ही दोघांना वेगवेगळ्या भावनांचा अनुभव येऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या स्वत: च्या मार्गाने सामना करते, म्हणून आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
(वाचा – Pregnancy At 40 Age | चाळीशीतील गर्भधारणा – कशी घ्याल काळजी?)
एकमेकांना आधार कसा द्याल?

1. स्वतःला साक्षर करा: गर्भधारणा, बाळंतपण आणि तुमच्या जोडीदाराच्या शरीरात होत असलेल्या बदलांबद्दल जाणून घेण्यासाठी वेळ काढा. काय अपेक्षित आहे हे समजून घेणे तुम्हाला अधिक चांगले समर्थन प्रदान करण्यात मदत करू शकते.
2. शारीरीक व मानसिक आधार द्या : शारीरिक आणि भावनिकरित्या उपस्थित राहून तुमचा पाठिंबा दर्शवा. तपासणी , अल्ट्रासाऊंड स्कॅनिंगला एकत्र जा. ज्यामुळे एकमेकांना आधार वाटेल आणि तणाव दूर करता येईल.
3. कामात मदत करा: घरातील कामे, स्वयंपाक आणि इतर कामात मदत करा. ज्यामुळे शारीरिक आणि भावनिक ओझे कमी करण्यात मदत होऊ शकते.
4. एकमेकांना समजून घ्या: हार्मोनल बदलांमुळे गर्भधारणेत मूड स्विंग्ज, चिंता किंवा थकवा या समस्या जाणवू शकतात. अशावेळी चिडचिड न करता एकमेकांना समजून घ्या.
5. एकमेकांची काळजी घ्या : शारीरीक समस्यांना सामोरे जाताना एकमेकांची काळजी घ्यायला विसरु नकां वेळोवेळी औषध घेणे, व्यायाम करणे, आनंदी राहणे या माध्यमातून एकमेकांची काळजी घ्या.
6. नाते आणखी मजबूत कराः रोमँटिक डिनर, मुव्हीजला जाणे किंवा बीचवर फेरफटका मारणे, छोट्या सहलीला जाणे. एकत्र वेळ घालवा.
7. आनंदी रहा: एकत्र छंद जोपासा, ज्या गोष्टींमध्ये दोघांनीही आनंद मिळतो अशा गोष्टी करा जसे की बागकाम, चित्रकला, वाद्य वाजविणे, गाणे म्हणणे, सायकलींग करणे.