क्रिकेटच्या माध्यमातून लिंग समानता, मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि मुलींना समान संधी असा संदेश देण्यासाठी आयसीसी (इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल) आणि युनिसेफ यांनी हातमिळवणी केली असल्याची माहिती युनिसेफच्या देश प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे यांनी आज दिली. भारतात सध्या सुरू असलेल्या आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप २०२३ च्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
भारतात क्रिकेटचा खेळ खूप लोकप्रिय असून त्यामाध्यमातून मुलांच्या प्रश्नांबद्दल जनजागृती करणार असल्याचा मानस सिंथिया यांनी व्यक्त केला. “आयसीसीसोबत आम्ही २०१६ पासून भागीदारी केली असून क्रिकेटच्यामाध्यातून मुलांच्या प्रश्नांबद्दल, लिंग समानतेबद्दल आणि मुलींना संधी देण्याबद्दल कायम जागरुकता करत असतो. भारतात, ‘वन डे फॉर चिल्ड्रन’ हा उपक्रम राबवण्यात येत असून आमचे अम्बेसेडर आणि जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि मुथया मुरलीधरन हेसुद्धा सोबत आहेत. आज भारत आणि श्रीलंका मॅचच्या वेळी संपूर्ण वानखेडे स्टेडियम निळ्या रंगामध्ये रंगणार असून त्यातून लोकांना मुलांच्या प्रश्नांविषयी माहिती मिळेल,” असे त्यांनी सांगितले.

तसेच यानिमित्ताने प्रत्येक भारतीयाने मुलांच्या हितासाठी प्रतिज्ञा करावी, असे आवाहनही सिंथिया यांनी केले. मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक देऊ, बालविवाह आणि मुलांवर होणारी हिंसा याविरोधात उभे राहू, माझ्या कुटुंबामध्ये सर्वजण एकत्र जेवतील, मुलगा आणि मुलगी दोघेही एकत्र शाळेत जातील आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करतील, मुलांच्या भविष्यासाठी या पृथ्वीचे रक्षण करीन या प्रतिज्ञांचा समावेश या उपक्रमात आहे. आतापर्यंत भारतात ४० हजार लोकांनी या प्रतिज्ञा घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
मुलांविषयी जागृतीसाठी क्रिकेटचा माध्यम म्हणून वापर करत असल्याबद्दल सिंथिया यांनी विशेष उल्लेख केला. “केवळ शाळेत जाऊन अभ्यास करणं म्हणजे शिक्षण नाही. क्रिकेटसारख्या खेळाच्या माध्यमातून खिलाडू वृत्ती मुलांमध्ये यावी, आपल्या चुकांमधून नवीन गोष्टी शिकता याव्यात, मुलींनाही खेळाची संधी मिळावी, मुलगा-मुलगी भेद करू नये,” अशी अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या.
गेल्या आठवड्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाने ३१ ऑक्टोबर रोजी, वानखेडे स्टेडियमवर मुंबईतील भारत स्काउट्स आणि गाईडच्या सुमारे ५० मुलांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. त्याआधी २८ ऑक्टोबर रोजी, पुण्यातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ५० मुलांनी गहुंजे येथील एमसीए स्टेडियममध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघाशी संवाद साधला आणि त्यांच्याबरोबर खेळही खेळला. साधारण १२ ते १५ वर्षे वयोगटातील ही मुले खेळाडूंना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी खूप उत्सुक होती, असेही त्या म्हणाल्या.