योग्य आणि माफक दरात उपचार घेण्यासाठी अनेक जण महापालिका रुग्णालयांना पसंती देतात. उत्तम डॉक्टर्स आणि चांगल्या सोयी असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या रुग्णालयांना नागरिकांची पसंती मिळत आहे. पण OPD साठी येताना अनेकदा रुग्णांना महानगराच्या गर्दीचा सामना करावा लागतो. ट्रेनमध्ये असणारी गर्दी आणि ट्राफिक टाळूण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयातील वेळा या बदलण्यात आलेल्या आहेत. वेळांमध्ये जो बदल झाला आहे त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळण्यास मदत होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे.
ट्रेनमध्ये वाढत जाणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कामाच्या वेळांमध्ये बदल करावा अशी मागणी केली होती. रेल्वेवर पडणारा अतिरिक्त भार त्यामुळे कमी होईल अशी अपेक्षा होती. रेल्वेचा हा भार कमी करण्याची जबाबदारी महापालिका रुग्णालयांनी घेतली आहे. रुग्णांना अगदी सहज येता यावे यासाठी त्यांनी त्यांच्या ओपीडीच्या वेळांमध्ये बदल केला आहे. 20 नोव्हेंबरपासून त्यांच्या बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बाह्यरुग्ण विभागाची वेळ यापूर्वी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आहे. तर नोंदणी करण्याची वेळ सकाळी 8.30 ते दुपारी 11 वाजेपर्यंत होती. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सर्व रुग्णालयांना बाह्यरुग्ण विभाग एक तास अगोदर सुरू करण्याचे म्हणजे 8 वाजता सुरू करण्याचे तसेच डॉक्टरांनीही सकाळी 8 वाजता बाह्यरुग्ण विभागत उपस्थित राहावे असे आदेश दिले आहेत. त्यामुळे या नव्या वेळेनुसार आता नोंदणी करण्याची खिडकी ही सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. तर बाह्यरुग्ण विभाग सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. याचा फायदा रुग्णांना आणि रेल्वेप्रशासन दोघांना होणार आहे.