अंकिता बनली पहिली कॅप्टन

Bigg Boss Marathi 5 च्या घरात 1 आठवडा थोडासा रडत घालवल्यानंतर आता कोकणहार्टेड गर्लला घरातील गेम कळायला लागला आहे, असे म्हणायला हवे. कारण घरातील पहिली कॅप्टन होण्याचा मान तिने मिळवलेला आहे. कोणतीही ताकद न वापरता केवळ हुशारीवर तिने हा खेळ जिंकल्यामुळे तिच्या चाहत्यांकडून तिचे चांगलेच कौतुक होत आहे. एवढेच काय तर दुसरीकडे घरात असलेला अरबाज पटेल (Arbaaz Patel) आणि त्याच्या टोळीतील सदस्यांवर मात्र अनेक ठिकाणी टीका होताना दिसत आहे. चला जाणून घेऊया काय घडलं या टास्कमध्ये तेही डिटेलमध्ये

Bigg Boss Marathi 5 : गुलीगतला हलक्यात घेणे पडेल का भारी

इंजिन राखण्यात मारली अंकिताने बाजी

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

कॅप्टन्सीच्या टास्कसाठी घरात हिरवी मार्गिका आणि लाल मार्गिका अशी मेट्रो आणली होती. याला प्रत्येकी दोन इंजिन होते. जो या गाडीचा मोटरमन होईल त्याला कॅप्टन्सीमधून इतरांना बाहेर काढण्याची संधी मिळणार होती. पहिल्याच फेरीत अंकिताने आपली जागा मिळवली. तिला वैभव चव्हाण आणि धनजंयने कितीही हलवण्याचा प्रयत्न केला तरी ती जागेवरुन काहीही केल्या हलली नाही. तर दुसरीकडे अभिजीत सावंतनेही दुसऱ्या मार्गिकेच्या मोटरमनची जागा मिळवली. अंकिताची लाईन निवडण्यात आल्यावर तिने तीन सदस्यांना कॅप्टन्सीमधून बाद केले आणि वैभव चव्हाणला निवडले. त्यानंतर हा खेळ सुरु राहिला. या खेळाच्या शेवटी योगिताला कॅप्टन निवडण्याची संधी मिळाली. त्यावेळी तिने अंकिताला कॅप्टन म्हणून घोषित करत इतर सदस्य म्हणजे निक्की, अभिजीत, वैभव, अरबाज यांना बाद केले. अशाप्रकारे अंकिता या घराची कॅप्टन झाली.

अरबाज आणि वैभवला एका दट्ट्याची गरज

गेल्या भाऊच्या धक्क्यात अरबाजच्या आक्राळविक्राळ रुपावर आणि चिडीचा डाव खेळण्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. पण या आठवडयात त्याला याची अत्यंत गरज असल्याचे दिसत आहे. अरबाजच्या पाऊलावर पाऊल टाकणारा आणि घरात स्वत:ची काही ओळख नसलेला वैभव चव्हाण हा देखील फारच चुकीचा खेळ खेळताना दिसत आहे. तो अऱबाजची साईट किक दिसत असूनही तो ते मान्य करत नाही. अरबाजला या खेळात अनेकदा अभिजीत सावंतचा त्रास का आहे ? असा प्रश्न पडतो. कारण कॅप्टन्सी टास्कमध्ये अभिजीत पहिल्यांदा खूर्चीवर बसून देखील त्याने आपल्या ताकदीने त्याला ढकलून टाकण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर ‘मी नाही तर कोणीही नाही’ असे त्याचे वागणे फारच चुकीचे असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. खेळासाठी जिद्द असणं आणि चिडीचा डाव खेळणं यात फरक आहे हे अरबाजला समजावून सांगणे गरजेचे आहे.

वर्षा उसगांवकर ठरतायत सरस

पहिल्या आठवड्यात निक्कीने कितीही भांडणाने गाजवली असली तरी देखील तिच्यासारख्या मुलीला आपल्या स्टाईलने उत्तर देणाऱ्या वर्षा उसगांवकर आता अनेकांना कळू लागल्या आहेत. जशास तसे उत्तर देण्यात त्या चांगल्याच माहीर आहेत. कॅप्टन्सी टास्कमध्येही त्यांनी संचालकाची भूमिका निडर सांभाळली. अरबाज, वैभव, निक्की, जान्हवी हे त्यांच्या अंगावर कितीही आले तरी देखील त्यांनी आपला निर्णय बदलला नाही किंवा त्यांना घाबरलो असेही कुठे दाखवले नाही. त्यामुळेच यांना त्या चांगल्याच पुरुन उरत आहेत यात कोणतीही शंका नाही.

जान्हवीलाही आहे रट्ट्याची गरज

या घरात आल्यापासून जान्हवीला हे सगळं मालिकेत घडत असल्यासारखे वाटत आहे. कारण काहीही झालं तरी तुला घरातून काढून टाकीन किंवा तू मूर्ख आहेस असेच शब्द उच्चारताना दिसते. तिच्या खेळापेक्षा तिचे तोंड हे अधिक चालते असे अनेकदा दिसते. काहीही मुद्दे काढून भांडणं, अरबाजच्या चुकीचेही समर्थन करणं असे सगळे ती करत असल्यामुळे ती देखील सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे.

आता या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यात नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *