मुंबईसह राज्यात वाढणारी बालगुन्हेगारी, शाळाबाह्य मुले आणि लैंगिक शोषण पाहता याला थोपवण्यासाठी राज्यात तातडीने डे केअर सेंटर सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य बाल हक्क आयोगाने राज्य सरकारकडे केला आहे. खासगी आणि सरकारी तत्वावर डे केअर सेंटर सुरु करण्याची मागणी या प्रस्तावातून करण्यात आलेली आहे. हा प्रस्ताव बाल हक्क आयोगाने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे दिला आहे. Day Care Centre In Maharashtra
मुंबईसह ग्रामीण भागात जर डे केअर सेंटर सुरु झाले तर बालंकासाठी सुरक्षित निवारा उपलब्ध होईल. इतकेच नाही तर कुपोषण, बालकांचे लैंगिक शोषण, शाळाबाह्य मुलं होण्याचे प्रमाणही कमी होईल.त्यामुळेच मुंबई आणि उपनगरात असे डे केअर सेंटर सुरु करण्यासंदर्भात बाल हक्क आयोग्या अक्ष्यक्षा सुशीबेन शहा यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन सकारात्मक अशी चर्चा केली.
यासंदर्भात महिला व बालविकास विभाग यांनी कामगार विभाग ,पोलिस विभाग, शालेय शिक्षण विभाग अशा संबंधित सर्व विभागांसमवेत एकत्र बैठक घेऊन नियमावली, मार्गदर्शक सूचना याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना दिल्याची माहिती सुशीबेन शहा यांनी दिली. राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि अशासकीय संस्थांच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील विभागीय स्तरावर 8 मार्चपर्यंत प्रत्येकी किमान एक डे केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ॲड. शहा यांनी सांगितले.
यावेळी रुबल अग्रवाल, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, विपला फाउंडेशन, युनिसेफ, अपनालय, स्त्री मुक्ती संघटना, मुंबई क्रेश सेंटर, मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.