चहा आणि कॉफी हे अनेकांसाठी अमृतपेयापेक्षा काही कमी नाही. खूप जणांची सकाळ ही चहा कॉफीने होत असते. त्यामुळे दिवसातून एकदा तरी आपण याचे सेवन करतोच. याशिवाय हल्ली चहा-कॉफी पिण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीही आपणास सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. कडक चहा करताना त्यात मसाला आणि वेगवेगळ्या घटकांचा होणारा मारा हा त्याची चव नक्कीच वाढवतो. पण त्याचे आरोग्यास असलेले दुष्परिणाम तुम्हाला माहीत आहेत का? नसेल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी खूपच जास्त महत्वाचा आहे.
दूध पूर्णान्न असूनही …

दूध हे पूर्णान्न म्हणून ओळखले जाते. दूधाच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात हे आपण जाणतो. पण हेच पूर्णान्न अनेकदा आपले आरोग्य बिघडण्यास देखील कारणीभूत ठरु शकते हे तुम्ही जाणता का? दूध हे पचण्यास सगळ्यात जास्त कठीण असे पेय आहे. दूध पूर्णान्न यासाठीच म्हणून ओळखले जाते की, दूधाच्या सेवनामुळे इतर काहीही पिण्याची इच्छा होत नाही. शिवाय दूधाचे सेवन तुम्ही कोणत्या स्वरुपात करताय ते देखील माहीत असणे फार महत्वाचे आहे. आपल्या देशात आणि अन्यही काही देशांमध्ये चहा- कॉफीमध्ये दूध घालून पिण्याची पद्धत आहे. चहा आणि कॉफी चांगली कढवून मग त्यात दूध घालून चांगले उकळले जाते. यामुळे होते असे की, आपण प्रत्यक्ष चहा-कॉफीची चव घेऊच शकत नाही. आपण पितो ते एक प्रकारे बासुंदी पित असतो. दोनहून अधिक गोष्ट आपण त्यात एकाचवेळी पित असतो. त्यामुळेच अनेकदा आपल्याला त्रास होण्यास सुरुवात होते. (Tea & Coffee)
चहा-कॉफीत दूध घालून प्यायल्याने होतात हे त्रास
चहा-कॉफी यामध्ये कॅफेन असते. त्याला त्याची अशी एक चव असते. पण त्यात दूध घातल्यानंतर त्याची चव अधिक चांगली लागते. पण काही वेळा त्याचा त्रासही होऊ लागतो.
- दूध हे पचण्यास जड असते. चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर अनेक जणांना ॲसिडिटीचा त्रास होऊ लागतो. याकडे दुर्लक्ष केले तर ही हायपर ॲसिडिटीचा त्रास सुरु होतो.
- दूधामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. तर काही जण चहा किंवा कॉफीचे सेवन केवळ पोट साफ होण्यासाठी करतात. त्यामुळे ती एक सवय होऊन जाते.
- चहा- कॉफीत दूध घालून प्यायल्यामुळे जळजळ होण्यास सुरुवात होते. पोट फुगल्यासारखे वाटते.
त्यामुळे शक्य तो ब्लॅक टी- ब्लॅक कॉफी ते ही एकच कप पिणे उत्तम!