काही लहान मुले ही सतत चिडचिड करतात. त्यांच्या मनाविरोधात कोणत्याही गोष्टी झाल्या की, मुलांची अशी काही चिडचिड होते की, चार लोकांसमोर कितीही समजावले तरी देखील ते पालकांचे ऐकायचे नाव घेत नाही. अशावेळी पालकांना खूप लाज वाटते. आपण आपल्या मुलांना असे काही शिकवत नाही. परंतु तरीही आपली मुलं अशी का वागतात. अनेक जण मुलांना त्याचक्षणी मारतात, तर काही पालक मुलांचाच मार खाऊन घेतात. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का? तुमची मुलं नेमकी कोणत्या कारणांमुळे चिडचिड करतात? तर तुम्हाला यामागील काही कारणं माहीत असायला हवीत. कारण मुलांची चिडचिड होण्यामागेही काही ठोस कारणं असू शकतात. जी त्यांच्या आरोग्याशी निगडीत असतात.
Benefits Nabhi Oil | नाभीत तेल घालण्याचे हे आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे
खानपानाच्या सवयी
लहान मुलांना कधीकधी आपण अशा काही गोष्टी खाण्याची सवय लावतो की, ज्या नंतर जाऊन आपल्यालाच त्रासदायक ठरतात. चॉकलेट किंवा गोड पदार्थ हे अनेकदा लहान मुलांसाठी चांगले नसतात. शरीराला साखरेतून उर्जा मिळते ही गोष्ट जरी खरी असली तरी देखील याचे अतिरिक्त सेवन हे मुलांच्या चिडचिडेपणासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे मुलांना गोडाच्या गोष्टी थोड्या बेतानेच दिलेल्या बऱ्या असतात. कारण अचानक साखरेचे पदार्थ बंद केल्यानंतरही त्यांची तितकीच चिडचिड होऊ शकते.
बदलते वेळापत्रक
पालकांना नोकरी करुन मुलांना वेळ देणे हे गरजेचे आहे. पण हल्लीच्या नोकऱ्यांमध्येही पालकांना अनेक चॅलेंजेस असतात. कधी कोणते काम येईल हे सांगता येत नाही. तुमचे वेळापत्रक जर कायमच गडबडलेले असेल आणि तुमच्या मुलांसाठी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर मुलांमध्ये तुमच्या विरोधात थोडासा चिडचिडेपणा होतो. तुमच्या घरी येण्या न येण्यावर त्याचे इतरांकडे सांभाळणे अवलंबून असेल तर अशा बदलांना ते लगेच तयार होत नाही. त्यामुळेही त्यांची चिडचिड होणे स्वाभाविक आहे.
सतत ओरडणे
आपली मुलं शिस्तीतच राहिली पाहिजेत असा खूप जणांचा आग्रह असतो. पण मुलांसाठी या गोष्टी नव्या असतात त्यांना त्या सहज आत्मसात होत नाही. थोडा वेळ लागतो. एखादी गोष्ट त्याने तुमच्या मनाप्रमाणे केली नाही तर त्याला चारचौघात मारणे, ओरडणे हे चांगले नाही. कारण त्याचे पडसाद हे नक्कीच उमटतात. मुलं त्यामुळेही तुमच्या गोष्टी ऐकत नाहीत, उलट बोलतात, एखाद्या मारतात. त्यामुळे शिस्त लावताना त्यांचे वय विचारात घेऊन थोडे कलेने घ्या.
औषधांचे सेवन
लहान मुलं जर थोडी आजारी असतील आणि त्यांच्यावर काही कालावधीपासून उपचार सुरु असतील तर ती थोडी चिडचिडी असतात. आपल्या आजारपणामुळे ते आधीच त्रस्त असतात. त्यातच सतत औषधे, डॉक्टरच्या फेऱ्या अशा गोष्टीही त्यांना सतत त्रास देऊ लागतात. त्यामुळे ते चिडचिडे असतात. आपण इतरांसारखे का नाही असे त्यांना सतत वाटते. त्यामुळे त्यांची चिडचिड होणे अगदी स्वाभाविक असते.
दुसऱ्याशी तुलना करणे
खूप पालकांना सतत दुसऱ्या मुलांशी तुलना करण्याची सवय असते. ही सवय मुलांच्या मनावर खोल असा परिणाम करत असते. मुलांसमोर कधीही दुसऱ्याची तारीफ करताना आपलं मुलं किती खराब हे अजिबात दाखवू नका. त्यामुळे त्यांच्या मनात द्वेषाची भावना निर्माण होते जी अजिबात चांगली नाही.
या काही गोष्टी लक्षात ठेवून मुलांची चिडचिड कशी रोखता येईल याची काळजी घ्यावी.