वजन कमी करताना टाळा या चुकावजन कमी करताना टाळा या चुका

Weight Loss Mistakes आपल्यापैकी खूप जणांना वजन कमी करायचं असतं. पण वजन कमी करण्यासाठी काही जण असे काही उपाय करतात की, त्यामुळे त्यांचे वजन तर कमी होतेच पण त्यांच्या शरीरात त्राण उरत नाही. वजन कमी करणे म्हणजे तुमच्या शरीरातील सगळी शक्ती निघून जाणे असे होत नाही. वजन कमी करताना तुमचे शरीर हे स्वस्थ राहायला हवे. तरच वजन कमी करण्याचा खरा फायदा तुम्हाला होऊ शकतो. आपण जाणते आणि अजाणतेपणी अशा काही चुका करतो त्याचे परिणाम लगेच नाही तर कालांतराने नक्कीच जाणवू लागतात. या काही चुकांची एक यादीच आम्ही खास केली आहे जी तुम्ही जाणून घेतली तर तुमच्या चुका या नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल.

Walk For Weightloss | किती चालल्याने वजन होते कमी, वाचा महत्वाची माहिती

चूक क्रमांक 1 – कमी खाणे

खूप जणांना असे वाटते की, मी कमी खाल्ले किंवा उपवास केला तर माझे वजन झपाट्याने कमी होईल. एका अर्थी ही गोष्ट अगदीच खरी असली तरी ती जीवघेणी ठरु शकते. अनेक मुली आपले वजन झटपट करण्यासाठी जेवणच बंद करतात. दिवसातून एकवेळा तेही शरीराला पुरणार नाही असे पदार्थ खातात. पहिले काही दिवस त्यांना आपल्यात खूप काही चांगला बदल झाला असे वाटते. पण जसे काही दिवस उलटतात तसे त्यांना केस गळती, सांधेदुखी असे काही त्रास होऊ लागतात. त्यामुळे कमी खाणे हा योग्य पर्याय नाही. तर योग्य प्रमाणात खाणे हे गरजेचे असते

चूक क्रमांक 2 – खूप व्यायाम करणे

व्यायाम हा शरीरासाठी खूपच महत्वाचा आहे. तुमचं वय काहीही असो. तुमच्या शरीरासाठी थोडा व्यायाम हा आवश्यक असतो. दिवसातून कमाल 45 मिनिटे इतका असा व्यायाम होणे गरजेचे असते. तो व्यायाम झाला की, तुम्हाला नक्कीच वजन कमी होण्यास मदत मिळते. पण व्यायाम करताना तुमचे शरीर व्यायामाचे नसेल तर त्याला व्यायामाचे बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो. अचानक तुम्ही 45 मिनिटांचा व्यायाम करायला सुरुवात कराल तर त्यानंतर तुम्हाला प्रचंड थकवा जाणवेल. काहीही कारण नसताना जोरजोरात चालाल तर तुम्हाला धाप लागेल. त्यामुळे सांधेदुखी, डोकेदुखी असे होऊ लागेल.

चूक क्रमांक 3 -चुकीचा डाएट करणे Weight Loss Mistakes

खूप जणांना ऑनलाईन पाहिलेला डाएट करायची सवय असते. अहो तुम्ही पैसे वाचवण्यासाठी जो फुकटचा डाएट फॉलो करायचा विचार करत आहात तो डाएट तुमच्या वयासाठी, तुमच्या शरीरासाठी योग्य आहे का? याचा कधी विचार केला आहे का? प्रत्येकाचे शरीर आणि व्याधी या वेगळ्या असतात. डाएटमध्ये असलेला एका पदार्थ जर तुम्हाला बाधत असेल आणि तो तुम्ही सातत्याने खाल्ला तर तुमचे पोट बिघडू शकते. उदा. अनेकदा जीमला जाणाऱ्यांच्या डाएटमध्ये अंडी, चिकन याचा समावेश असतो. त्याचे एक प्रमाण त्यांना सांगितलेले असते. ते तितका वेळ जीममध्ये शरीराची झीज करतात म्हणून त्यांना ते डाएट चालून जाते. पण तुम्ही अचानक चिकन, अंडी खाल्ली तर त्यामुळे तुमच्या पोटाचा बिघाड होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य तोच डाएट करा.

चूक क्रमांक 4- वजन कमी करायचे की नाही

खूप जणांना त्यांचे वजन त्यांच्या शरीराच्या सगळ्या निकषांप्रमाणे योग्य आहे की नाही हे माहीत असायला हवे. तुमची उंची, वय या तुलनेत तुमच्या वजनाचा एक तक्ता असतो. त्यानुसार तुम्ही असाल तर काहीही कारण नसताना वजन कमी करायला अजिबात जाऊ नका. जर तुमचे ध्येय बारीक होणे असेल तर तसे व्यायाम करता येतात. त्यामध्ये तुमच्या वजनाला धक्का न लावता तुम्हाला काही व्यायाम दिले जातात. ज्यामुळे तुमचे शरीर स्वस्थ आणि सुडौल दिसते.

चूक क्रमांक 5 – वजन सतत तपासत राहणे

एखाद्याने वेटलॉस जर्नी सुरु केली असेल तर त्याला थोडा वेळ लागतो. खूप जणांचे वजन हे पटकन कमी होत नाही. तर काही जणांचे वजन हे पटकन कमी होते. ते दिसून येते. काही जणांचे वजन कमी झाले तरी ते काही केल्या दिसून येत नाही. परंतु याचा अर्थ सतत वजनाच्या काट्यावर उभे राहून तपासणे योग्य नाही. तुम्ही सातत्याने व्यायाम करत असाल तर 15 दिवसांनी तुमचे वजन तपासा. सतत वजन तपासत राहाल तर तुमचा आत्मविश्वास कमी होईल. कारण या प्रक्रियेत अनेकदा वजनाचा काटा कधी आपल्या बाजूने तर कधी जड होणाच्या बाजूने असतो. त्यामुळे ताण येऊ शकतो. निराशाही येऊ शकते. त्यामुळे हे करणे टाळा.

आता वजन कमी करताना या चुका होणार नाही याची नक्की काळजी घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *