Vrat Aloo Sabji उपवासाच्या दिवशी आपल्याला कधीकधी चटकदार खाण्याची इच्छा असते. उपवास सोडताना तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा आला असेल तर सोशल मीडियावरुनच एक भाजीची रेसिपी आम्ही पाहिली. ती आम्हाला खूप आवडली. म्हणूनच आज तुमच्यासोबत ती शेअर करत आहोत. याला अनेक जण. व्रतवाले आलू, फलहारी आलू सब्जी असे देखील म्हणतात. कमीत कमी साहित्यात होणारी अशी ही मस्त रेसिपी तुम्ही पुरीसोबत खाल्ली तर तुम्हाला ती नक्कीच आवडेल. चला जाणून घेऊया कशी बनवतात ही व्रतवाल्या बटाट्याची भाजी
अशी करा Vrat Aloo Sabji

एरव्ही आपण बटाट्याची भाजी उपवासाची बनवून खातो.ती सुकी असते त्याच्यासोबत पुरी खाताना ती सुकीच खावी लागते. पण ही भाजी थोडी ओलसर असते याला ग्रेव्ही असते त्यामुळे त्याची चव अधिक लागते. कमीत कमी साहित्यात बनवणाऱ्या या भाजीची रेसिपी चला जाणून घेऊया.
साहित्य: 4 ते 5 उकडलेले बटाटे, एक मोठा टोमॅटो, एक मोठा चमचा जिरे, तीळ, मिरची, चवीनुसार तिखट, मीठ, धणे पूड, तूप
कृती :
- बटाटे उकडून ते हाताने कुस्करुन घ्या.
- पातेल्यात तेल किंवा तूप गरम करुन त्यात जिरे आणि तिळाची फोडणी करा. ती चांगली तडतडली की, त्यात मिरची घालून फिरवून घ्या. जर तुम्हाला टोमॅटो चालत नसेल तर नाही टाकला तरी चालेल. त्या ऐवजी तुम्ही लिंबू पिळू शकता.
- टोमॅटो घालून त्याला थोडा वेळ फिरवून त्यात लाल तिखट, धणे पूड, मिठ घालून चांगले एकजीव करा.
- टोमॅटो चांगला शिजला की, त्यात कुस्करलेले बटाटे घाला त्यानंतर पाणी घालून त्याला चांगली उकळी येऊ द्या.
- बटाट्यामुळे याची ग्रेव्ही घट्ट होते. त्यामुळे पुरीसोबत खाताना आंबट, तिखट अशी चव लागते.
नवरात्रीत देवीला प्रसाद दाखवताना ही रेसिपी केली जाते. तुम्ही ही कधीही करुन पाहा. तुम्हाला ही नक्कीच आवडतील.