मुंबई – राज्यात बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत. अशी परिस्थिती असताना सरकारने फक्त 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. सरकारने पिकविमा कंपन्यांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे की, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी? असा सवाल करत मंत्रिमंडळ निर्णयाचा फेरविचार करावा तसेच कर्नाटकच्या धर्तीवर राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकं नष्ट झाली आहेत. रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरू आहेत. शेतकऱ्यांना गत वर्षीचे देय अनुदान सरकारने अद्याप दिले नाही. खरिप हंगाम हा अत्यंत वाईट गेला असून, अपुऱ्या पावसामुळे रब्बी हंगामाची शाश्वती नाही. चारा छावण्या उभ्या कराव्या लागतील अशी परिस्थिती आहे. शेतकरी आज मोठ्या संकटात आहे. शेतकऱ्याला या परिस्थितीत मदत करण्यासाठी सरसकट दुष्काळ जाहीर केला पाहिजे. तरच सर्वांना दुष्काळाचे लाभ मिळतील. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
विजय वडेट्टीवार म्हणाले, केवळ पिकविमा कंपन्यांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्यास हा निर्णय मागे घ्यावा. या निर्णयामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होईल. प्रशासनाला हाताशी धरून चुकीची आणेवारी दाखवत सरकारने या 40 तालुक्यांची निवड केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला शेतकरी कदापी माफ करणार नसल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.