मुंबई – विविध सरकारी विभागातील अनेक पदे न भरल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये नाराजी असताना या सरकारने शासकीय कंत्राटी भरतीचा शासन निर्णय काढून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांची एक प्रकारे थट्टाच केली आहे. कंत्राटी भरतीमुळे आरक्षण हिरावण्याचा प्रयत्न सरकार करत असून सरकारचा हा नोकऱ्या हिरवण्याचा पंचवार्षिक डाव उधळवून लावण्यासाठी व आपले संविधानिक हक्क, शिक्षण आणि नोकरी वाचविण्यासाठी २० ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी केले आहे.
शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, संविधानाने आपल्याला आरक्षणाची सर्वात मोठी ताकद दिली आहे मात्र थेट सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी, एससी आणि एसटी या प्रवर्गातील लोकांच्या आरक्षित जागा संपवून, त्यांचा हक्क संपुष्टात आणून आरक्षाणालाच बगल दिली जात आहे. शासननिर्णय पान क्रमांक पाच वरील सहाव्या मुद्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, पाच वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाईल. मात्र पाच वर्ष हा मोठा कालावधी असून अनेकांना यामुळे शासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून शासकीय नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मेहनतीवर पाणी फिरेल आणि त्यांच आयुष्य उध्वस्त होईल. पाच वर्षांसाठी कंत्राटी भरतीचा शासननिर्णय काढला आहे आताच याला विरोध केला नाही तर पुढे जाऊन १० वर्षांचा कंत्राटी भरतीचा शासननिर्णय काढला जाईल आणि त्यामाध्यमातून आपला आरक्षणाचा हक्क हिरावून घेतला जाईल, म्हणूनच याविरोधात रस्त्यावर येण्याची आवश्यकता आहे.
शिवानी वडेट्टीवार पुढे म्हणाल्या की, आपल्या पुर्वजांनी ब्रिटीशांच्या ईस्ट इंडीया कंपनीच्या १५० वर्षाच्या गुलामगीरीतून आपल्याला मोठया संघर्षातून स्वातंत्र मिळवून दिले. त्यांनतर भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपले हकक व अधिकार सुरक्षित केले गेले आहेत.मात्र आज सरकारने शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करुन आपल्या हक्काची सरकारी नोकरी संपवायला सुरुवात केली आहे. जि.प. शाळेच्या खाजगीकरणातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद करण्याचा घाट घातला आहे. कर्मचारी वर्गाचे पेंशन बंद करुन त्यांना दुसऱ्याच्या पुढे म्हातारपणात हात पसरविण्यासाठी भाग पाडत आहे. शेतकरी व शेतमजूर तर सरकारच्या गीणतीतही नाही. शिक्षण, नोकरी, रोजगार,गरीब व मजूरांना सोयी सुविधा द्यायच्या म्हटल्या की सरकार पैसे नाही असे कारण पुढे करतात, तेच सरकार उद्योजकांचे हजारो कोटीचे कर्ज माफ करत आहे. पैसे नाही हा बहाणा आहे आपल्या मुलांना ठेकेदाराच्या ताब्यात देवून त्यांचे शोषण करायचे आहे. नवी गुलामी व वेठबिगारी लादायची आहे. परंतू लक्षात घ्या हे आपण होऊ द्यायचे नाही. त्यासाठी आता आरपारची लढाई सुरु झाली आहे. आपण आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आपल्या मुलांसह चंद्रपूर येथील जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन शिवानी वडेट्टीवार यांनी केले आहे.