राज्यात आपलं सरकार गेलं पण तुम्ही लक्षात घ्या देशभरात जे लोक भाजपसोबत गेले आहेत. त्यांच्यासोबत जनता नाही आहे. भाजपची सत्ता देशातील अनेक राज्यांमध्ये नाही आहे. देशात सध्या भाजप विरोधी वातावरण तयार झालेले आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईमध्ये कार्यकर्त्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हटले आहे.
शरद पवार साहेब पुढे म्हणाले की, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात काम करत आहे. पक्षातून बाहेर गेलेल्या काही लोकांनी दिल्लीच्या कोर्टात आपल्याला नेले आहे. पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. काही लोक पक्षावर दावा करत न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे खऱ्या राष्ट्रवादीवर आता न्यायालयात संघर्ष करण्याची वेळ आली आहे. आता हे लोक निवडणूक आयोगात पक्ष, चिन्हावर दावा करत आहेत. पण खरी राष्ट्रवादी कोणाची हे जनतेला माहित आहे असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, राज्यात आपलं सरकार गेलं पण तुम्ही लक्षात घ्या देशभरात भाजपसोबत जे लोक आहेत त्यांच्यासोबत इतर लोक जावू इच्छीत नाहीत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार होत पण नंतर आमदार फुटले. दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल कोणत्या राज्यात भाजपा आहे? यावेळी असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. भाजपा देशात दिवसेंदिवस कमी होत आहे हे चित्र आता सिद्ध होत आहे. सत्तेचा गैरवापर होत आहे. असेही शरद पवार म्हणाले आहे.
भाजपा देशात दिवसेंदिवस कमी होत आहे हे चित्र आता सिद्ध होत आहे. सत्तेचा गैरवापर होत आहे. सत्ता ही लोकांसाठी असते. केंद्र सरकारचे निर्णय सामान्य लोकांच्या फायद्याचा नाही. राज्य सरकारने कंत्राटी पोलीस भरतीचा निर्णय घेतला आहे. पाेलीस खात्यामध्ये सर्व जातींना व महिलांना प्रतिनिधित्व मिळायला हवे. मात्र कंत्राटी भरतीमुळे सरकार या उद्देशाच हारताळ फासत आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीची पोलीस भरती चुकीची आहे. काही नोकरी ११ महिन्यांची आहे. ११ महिने काम केल्यावर पुढे काय करायच? असा प्रश्न देखील शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.
विधीमंडळात पावसाळी अधिवेशनाच्यावेळी विचारलेल्या प्रश्नात माजी मंत्र्यांनी १९ हजार ५५३ मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची माहिती दिली. एवढ्या महिला आणि मुली गायब आहेत, त्यांच्या घरच्यांची काय अवस्था असेल. ज्या महिला आणि मुली बेपत्ता आहे, त्यांची काय अवस्था असेल. त्यामुळे राज्यातील महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे. हे सरकार त्यांच्यासाठी काहीच करत नाहीये, त्यामुळे हे सरकार बदलण्याची भूमिका आता आपल्याला घेणे गरजेचे आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.
दोन तीन दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले की, कधीकाळी आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी वेगळा रस्ता स्वीकारला आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या अध्यक्षांची निवड केली. पण फरक फक्त एवढाच आहे की, तुम्ही ज्यांची निवड केली ते तुरुंगात कधी गेले नव्हते. आता दुसऱ्या बाजूचे किती गेले ते मला माहीत नाही, असा टोला लगावत शरद पवार म्हणाले की, तुम्हाला सर्वांना तो इतिहास माहीत आहे. आजचा दिवस हा समाधान व्यक्त करण्याचा दिवस आहे. कारण काल झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताला सामना जिंकवून देण्यात मुंबईच्या खेळाडूंचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आपण सगळे जण आनंदी आहोत. आज पक्षाची ही बैठक नवीन रस्ता देणारी, आत्मविश्वास वाढवणारी असल्याने याचा मला आनंद आहे, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मुंबई अध्यक्षपदी राखी जाधव यांची निवड करण्यात आली.पदाधिकारी मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आज पासून नवदुर्गा उत्सव सुरू झाला आहे आणि याच प्रसंगी आज मुंबईची अध्यक्ष पदाची जबाबदारी राखी जाधव यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मुंबई अध्यक्ष पदाची निवड काही दिवस थांबवण्यात आली होती. नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्याची अंतरिम जामीन मंजूर केला होता. तसेच त्यावेळी अनेक बंधन देखील घालण्यात आली होती. नवाब भाई यांना आणखी तीन महिने वाढीव अंतर जामीन मिळाला आहे परंतु बंधने अद्यापही कायम आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रमुख पदी कोणीतरी आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. मुंबई अध्यक्षपदी घेण्यात आलेल्या निवडणुकीत राखी जाधव यांचा एकमेव अर्ज आला असल्याने त्यांची बिनविरोध निवड निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित पदाधिकारी जाहीर सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे,पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, प्रदेश सरचिटणीस बबन कानवजे, मुंबई विभागीय निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. हरिष सणस, महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.