Putrada Ekadashi येत्या 21 जानेवारी रोजी पुत्रदा एकादशी येणार आहे. पौष महिन्यात कोणतीही व्रत वैकल्ये करु नका असे म्हणताना ज्यांना पुत्र प्राप्ती करायची असेल तर अशांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा असा मानला जातो. पौराणिक धारणेनुसार या दिवशी जर तुम्ही लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केली तर तुमचा वंशविस्तार होतो. ज्यांना काही कारणास्तव मुलबाळं नसेल आणि त्यांची देवावर अपार श्रद्धा असेल अशांनी आपल्या समाधानासाठी ही पुत्रदा एकादशी करण्यात काहीही हरकत नाही. पुराणात या दिवसाला अत्यंत महत्वाचे असे स्थान दिले जाते. जाणून घेऊया या दिवसाचे महत्व आणि पुजाविधी
पुत्रदा एकादशी कथा
द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिर यांनी भगवान श्रीकृष्ण यांना पौष पुत्रदा एकादशीची कथा सांगण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी या एकादशीचे अनन्यसाधारण असे महत्व असल्याचे सांगितले. या दिवशी ही व्रत कथा केवळ श्रवण करणाऱ्याने व्यक्तिच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ लागतात. त्याच्या अंगी एक विशिष्ठ शक्ती संचारते. त्याचे सारे संकंट दूर होण्यास मदत मिळते. त्यासंदर्भातील एक कथा अशी की, भद्रावती नावाच्या शहरात राजा सुकेतुमानचे राज्य होते. तो राजा अत्यंत दानवीर आणि कुशल होता. त्यामुळे त्याची प्रजा ही देखील खूश होती.
Makar Sankrant 2024 | चुकूनही घालू नका काळे कपडे, वाचा कारण
असे असूनही राजा सुकेतुमानला मुलबाळं नव्हते. त्यामुळे तो चिंतेत असायचा. असा विचार करत एक दिवस राजाने जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. रानात भटकत असताना तो एका ऋषी मुनींच्या जवळ येऊन पोहोचला. त्याने त्या ऋषींना नम्र पुर्वक असा नमस्कार केला. त्या ऋषीमुनींनी त्याच्या दु:खाचे कारण जाणले. त्याने राजाला सांगितले, तू व्यथेत दिसत आहे. राजा असून तू दु:खी का आहेस ? त्यावेळी राजाने त्या ऋषीला सांगितले की, देवाच्या कृपेने माझ्याकडे सगळे काही आहे, परंतु असे असूनही मला कोणीही मुलंबाळ नाही. उद्या माझ्या मृत्यूनंतर माझे पिंडदान करण्यासाठी कोणी नाही? माझा वंश पुढे नेण्यासाठी कोणी नाही.
त्यावेळी ऋषींनी सांगितले की, पौष महिन्यातील शुक्ल पक्षात एकादशी येते त्या एकादशीला जर विधिवत विष्णुची पूजा केली तर त्यामुळे अवश्य पुत्ररत्नाची प्राप्ती होते. ऋषीच्या म्हणण्यानुसार राजा आणि त्याच्या पत्नीने पुत्रदा एकदाशीला व्रत केले. त्यानंतर राजा सुकेतुमानला पुत्र रत्न झाले. त्यामुळे राजा अधिक सुखी झाला आणि त्यामुळे प्रजाही अधिक सुखी झाली.
असे करा व्रत
कथा वाचून तुम्हाला हे व्रत करण्याची इच्छा झाली असेल तर त्यादिवशी सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 पर्यंत तुम्हाला देवाचे नामस्मरण करायचे आहे. सकाळी विष्णुच्या मूर्तीला किंवा फोटोची विधिवत पूजा करायची आहे. यात तुळस, तीळ, पंचामृताने देवाला आंघोळ घालायची आहे. देवाचे नामस्मरण करताना गोपाल मंत्र देखील ऐकायचा आहे. या दिवशी शक्य तितके सात्विक भोजन तुम्हाला करायचे आहे. जर पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत केले तर त्याचा अधिक फायदा तुम्हाला नक्कीच होईल. या दिवशी दीपदान हे देखील महत्वाचे ठरते. तुम्हाला शक्य असेल तर जितके दानधर्म या दिवशी करता येईल तितके केेले तर चांगले. शिवाय जेऊ घालता येत असेल तर तसे देखील करा. त्यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल. इतकेच नाही. तर द्वादशीच्या दिवशीही तुम्हाला याचे पारायण करायचे आहे.
आता पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकदशी नक्की करा.