Pune News | पुणे महापालिकेने बुलडोझरच्या साह्याने मोडकळीस आलेल्या या भिडे वाड्याची इमारत जमीनदोस्त केलीय. या कारवाईमुळे भिडे वाड्याच्या जागेवर ऐतिहासिक स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दगडूशेठ गणपती समोरील याच वाड्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी ची पहिली शाळा सुरू केली होती. या जागेवर स्मारक व्हावं अशी अनेक वर्षांची मागणी होती. मात्र भाडेकरून सोबतच्या वादामध्ये हा विषय प्रलंबित होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर भिडे वाड्याच्या जागेवरती स्मारक उभारण्याला परवानगी देण्यात आली. त्यानुसार भाडेकरूंना नोटिसा देखील बजावण्यात आल्या होत्या. भाडेकरूंनी जागेचा ताबा सोडल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा भिडे वाड्यावर बुलडोझर चालवण्यात आला. ही जागा मोकळी झाल्यानंतर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा यथोचित स्मारक उभारण्यात येणार आहे.
हात्मा जोतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला १३ वर्षे उच्च न्यायालयात संघर्ष करावा लागला. ८० सुनावण्यांमध्ये भक्कमपणे बाजू मांडून याच ठिकाणी मुलींची पहिली शाळा भरली होती, हे न्यायालयात सिद्ध करून दाखवले.
न्यायालयाने हे मान्य करत सावित्रीच्या लेकींसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करणारा हा ऐतिहासिक भिडेवाडा कायदेशीर कचाट्यातून मुक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया पूर्ण करून भिडेवाडा ताब्यात घेतला जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
पुण्यातील २५७, बुधवार पेठ येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. गेली अनेक वर्षे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांमार्फत केली जात होती. यासाठी फेब्रुवारी २००६ मध्ये भिडेवाडा ताब्यात घेऊन तेथे राष्ट्रीय स्मारक करावे, असा ठराव महापालिकेच्या मुख्यसभेत झाला. त्यानंतर जानेवारी २००८ मध्ये स्थायी समितीने भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी मान्यता दिली.