मुंबई – समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला असून अनेकांनी यावरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. याप्रश्नी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या अपघातावर घाणेरडा राजकारण करण्याचे काम संजय राऊतने सुरु केले आहे. ज्या महामार्गाचे नाव हिंदुहृदयसम्राट बाबासाहेब ठाकरे यांचे नाव आहे, त्याला राऊत शाप कसे म्हणतात? राऊत यांचा मालक मुख्यमंत्री होता, त्यावेळी महामार्ग तयार करताना आमचा हिस्सा काय? असे विचारत होता. त्या कंत्राटदाराने तोंड उघडले, तर उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडणार नाही, अशी टीका नितेश राणे यांनी यावेळी केली.
संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, आज समृद्धी महामार्गावर जो दुर्देवी अपघात झाला. अतिशय दुखद घटना घडली. सरकार म्हणून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राज्यात विकासाची दालने खुली व्हावीत म्हणून हा महामार्ग तयार केला आहे. ज्या जनतेसाठी हा महामार्ग तयार करतोय, त्यावर अशा घटना व्हाव्यात अशी कोणाचीच इच्छा नसते. कोस्टल रोड हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मिरवत आहात. त्यावर उद्या अपघात झाला तर त्यासाठी उद्धव ठाकरे यांना दोषी ठरवायचे आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तर गुजराती भाषेतील फलकावरुन सुरु असलेल्या वादाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, शिवसेनेने त्यावेळी गुजराती भाषेत पत्र लिहिले होते. तेव्हा तुम्हाला गुजराती चालत होते. गुजरातचे मुख्यमंत्री आल्यावर तुम्हाला चटके लागत आहे. ३० नोव्हेंबर २०२१ ममता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या, उद्योजकांची भेट त्यांनी घेतली होती. तेव्हा मुख्यमंत्री म्हणून तुझ्या मालकाने स्वागत केले होते. त्याच बंगालमध्ये हिंदूंना जीवंत जाळले जाते. मग ज्या गुजरातमध्ये हिंदू सुरक्षित आहेत, गुजराती माणसाचे योगदान मुंबईत आहे. मग त्या गुजराती माणसांसाठी तुम्हाला चटके का लागतात. हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या जिहादींकडून तुम्ही सुपारी घेतली आहे का? असा टीका त्यांनी यावेळी केली.
ज्या समाजवाद्यांच्या विरोधात बाळासाहेबांनी इतिहास घडवला. मराठी माणसाचा आवाज म्हणून शिवसेना मोठी झाली. आता कधी रजा अकादमी, तर कधी डीएमके व समाजवाद्यांच्या खांद्याला खांदा लावून उद्धव बसत आहेत. आता दाऊदला बोलवा आणि त्याला दिवाळीचे फराळ खालायला घाला, असा टोलाही त्यांनी यावेळी लगाविला. तर मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आम्ही त्यांची समजूत काढू घटने अंतर्गत त्यांना आरक्षण मिळवून देऊ. ओबीसी किंवा इतर आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सर्वात मोठा झुगार हा मातोश्रीवर
क्रिकेट हा झुगार वाटत असेल तर पुरावे द्यावेत, असे थेट आवाहन त्यांनी यावेळी संजय राऊत यांना केले. तर सर्वात मोठा झुगार खेळणारा वरूण सरदेसाई हा राऊत यांचा भाचा आहे. सचिन वाझे व वरुण सरदेसाई यांवर जुगाराचे व सेटिंगचे आरोप झाले आहेत. सर्वात मोठा झुगार हा मातोश्रीवर बसला आहे.