आता रात्रशाळेत शिकून शिक्षण पूर्ण करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेत शिक्षण घेता येणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये सायंकाळच्या वेळेत रात्र अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार अंधेरी पूर्व येथील कोल डोंगरी परिसरातील नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत रात्र अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे या रात्र अभ्यासिकेचे उद्घाटन केले.( Night School in Mumbai)
उद्धघाटनावेळी त्यांनी सर्वअधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि म्हणाले की, मुंबईमध्ये आज रात्र अभ्यासिकेची नितांत गरज आहे. आपल्या शहरात अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागा नाही, आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे इच्छा असताना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास, प्रगती करण्यास अडथळे निर्माण होतात. या अभ्यासिकेमुळे मुलांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आहे त्यानिमित्ताने लवकरच आपल्या शहरात 350 रात्र अभ्यासिका सुरू व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही प्रथम रात्र अभ्यासिका सुरू झाली असून, यापुढे प्रत्येक वार्डमध्ये तशी सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे..
महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या तसेच परिसरातील खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात प्रवेश घेता येणार आहे. उत्कर्ष शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने पालिकेच्या शाळांमध्ये तळमजल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र खोली उपलब्ध असेल अशा इमारतीतच ६ ते ८ या वेळात रात्र अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आवश्यक असणार आहे. हा उपक्रम टप्प्याटप्प्याने
महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू होणार असून, त्याचालाभ या शाळेत शिकणाऱ्या साधारण ४ लाख विद्यार्थ्यांना होणार असल्याचे अपेक्षित आहे.
यावेळी आमदार पराग आळवणी, माजी नगरसेवक अभिजित सावंत आणि संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.