मी पुन्हा येईन व्हिडिओ झाला वायरलमी पुन्हा येईन व्हिडिओ झाला वायरल

BJP |शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मी पुन्हा येणार असा एक व्हिडिओ भाजपाच्या ट्विटर हँडलवर अनावधानाने पडला पण त्याचा गदारोळ महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वत्र झाला.एखादी राजकीय चूक अनावधानाने झाली तरी चर्चा होणे साहजिकच पण तो प्रसंग समजून न घेता बालिश बडबड करणे आणि तर्कवितर्क लढवत सत्ताधार्‍यांवर हल्ला चढवणे याचाच अर्थ सत्तेच्या लालसेपोटी अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणे असं म्हणायला हरकत नाही. तो व्हिडिओ सोशल मिडियावर पडताच जणुकाही भाजपात राजकी य भूकंप झाला अशी विरोधकांनी राळ उठवत अवघ्या काही क्षणात चर्चा घडवून आणली.सुषमा आंधारे, अतुल लोंढे, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांची बेताल बडबड आणि राजकीय बालिशपणा आपण समजू शकतो. पण जो नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून राहिला ज्यांच्याकडे एक मातब्बर अनुभवी नेते म्हणून पाहिले जाते. त्या पृथ्वीराज चव्हाण उर्फ बाबांची बुद्धी देखील कशी गहाण टाकल्यासारखी वहात गेली हे जनतेने पाहिले. कारण त्यांनाही प्रसिद्धीचा मोह जडला आणि त्या व्हिडिओवर बाबांनी अनेक चॅनेलला प्रतिक्रिया दिली.

तात्पर्य हे आहे की, विरोधकांना नेमकी घाई कशाची झाली?ज्यांनी आकलेचे तारे तोडत तर्क वितर्क लावत तब्बल बारा तास जनतेचं मनोरंजन केलं.एक गोष्ट खरी म्हणावी लागेल की वर्तमान स्थितीत राजकारण अगदीच म्हटले तर सावधगिरीचे होऊन बसले. डिजिटल जमाना हा खर्‍या अर्थाने प्रत्येक राजकीय पक्षाची परीक्षा घेण्यासारखाच झाला असून सोशल मिडिया मधून कुणीही सुटू शकत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांना आगामी काळात संघटनात्मक व्यवस्था चालवताना अत्यंत सजग आणि सावध रहाणे महत्वाचेच ठरणार. एक चुक डोकेदुखी होवु शकते. तसंच त्या चुकीचे तर्क वितर्क लावुन आपआपसात मतभेदसुद्धा होवु शकतात. गंमत बघा, मी पुन्हा येणार अशा प्रकारचा व्हिडिओ देवेंद्रजी फडणवीस यांचा जुन्या काळातला, सोशल मिडिया प्रत्येक पक्षाची गरज आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सर्वांच्याकडे आहे.

भाजपाच्या ट्विटर हँडलवर अधुनमधून नेत्यांचे वेगवेगळे व्हिडिओ संघटनात्मक कार्याची प्रेरणा देण्यासाठी टाकले जातात. कारण प्रत्येक पक्षाची त्या प्रकारची एक आयडियालॉजी असते. त्या यंत्रणेत काम करणार्‍या कुणाकडून तरी अनावधानाने चूक झाली पण पान पडले तर पिंपळगाव जळाले असे म्हणायला विरोधक मागे राहिले नाहीत. तो व्हिडिओ टाकणे याचं समर्थन कुणीच करू शकत नाही. पण बापरे बाप विरोधकांनी त्याचा बाऊ एवढा केला की, स्वत:ची बुद्धी थोडीसुद्धा न चालवता जणू काही पराचा कावळा करत ओरड केली. अर्थात तो व्हिडिओ कुणी टाकला? त्याचा उद्देश काय? याबाबत काही क्षणांत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी माध्यमासमोर येऊन माहिती दिली. एवढेच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानी जेव्हा हा विषय आला तेव्हा त्यांनी सहज दखल घेत व्हिडिओ डिलिट करण्याच्या सूचना केल्या. पण झालं काय? कुठल्याही प्रश्नावर आऊचा बाऊ करत आपले अस्तित्व दाखवण्यासाठी राज्यात काही नेत्यांची धडपड सुरू असते. अनेकांना नेतृत्वाच्या नजरेत उतरण्यासाठी काही तरी करावे वाटते, तर काहींना आपणच कसे त्या पक्षात सत्ताधार्‍यांवर आक्रमक होऊन हाल्ले चढवू शकतो हे दाखवण्याची जिद्द असते. प्रसंगी वैचारिक दिवाळखोरी झाली तरी चालेल पण टिव्हीवर मात्र मीच दिसायला हवे हा देखील आविर्भाव राज्यातील अनेकांच्या अंगी स्थायी स्वभाव झालेला दिसतो.

व्हिडिओ पडला अन् ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे जणु काही निद्रावस्थेत दचकून झाल्यासारखं क्षणात माध्यमावर आल्या. शिंदे-फडणवीसांनी केलेल्या दिल्ली दौर्‍याची चर्चा त्यांनी घडवली. काही तरी भानगड निश्चित आहे असं म्हणत त्यांनी भाजपावर हल्ला केला. नागपुर निवासी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी देखील बसल्याजागी अक्कलेचे तारे तोडत दिलेली प्रतिक्रिया बिनडोकच होती. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवारांनी ढोलकी बदडत आख्खा दिवस याच प्रश्नावर चर्चा घडवुन आणली. ज्या वडेट्टीवारांना पदावरून डिलिट करण्यासाठी नाना पटोले कामाला लागले आणि पटोलेंना अध्यक्ष पदावरून काढण्यासाठी वडेट्टीवार दिल्ली दौरे करू लागले. त्या मंडळींनं व्हिडिओवर प्रतिक्रिया देणे याचाच अर्थ राजकारणातला टाईमपास ही मंडळी करते की काय?लक्षात येतं. सर्वात दुर्दैव म्हणावं तसं पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत पहायला मिळालं. एखादा व्हिडिओ आणि त्याची शहानिशा कदाचित अंधारे, लोंढे यांच्याकडून आलेले तर्क वितर्क समजून घेऊ पण पृथ्वीराज चव्हाण ज्यांनी राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळलं. ज्यांचं आयुष्य राजकारणातलं चाळीस वर्षाचं त्यांना देखील त्या व्हिडिओचं गमक कळालं नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यांनी तर शिंदे- फडणवीसांच्या मनात मतभेद वाढतील. एवढेच नाही तर जणू काही ही खेळी भाजपचीच असं म्हणत हल्ला चढवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *