मुंबई – मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मालाड येथील मालवणी परिसरात राहणाऱ्या हिंदू कुटुंबियांसह दृढ स्नेहबंध आहेत. या परिसरात उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी स्वतः दरवेळी लक्ष घालून प्रयत्न केले आहेत. नागरिकांच्या हक्कासाठी लढा देऊन, आवश्यक सोयीसुविधा पुरवून, त्यांच्या समस्या सोडवून पालकमंत्री लोढा यांनी वेळोवेळो येथील नागरिकांना आधार दिला आहे. आज सुद्धा छेडा नगर कॉम्प्लेक्समध्ये राहणार्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री लोढा यांनी मालवणी पोलिस ठाण्यास भेट दिली आणि सुव्यवस्थेसाठी जबाबदार पोलिस अधिकारी आणि मुंबई महापालिकेच्या अधिकार्यांसह चर्चा केली.
छेडा नगर कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये काही कट्टरपंथीयांकडून अनधिकृत पद्धतीने प्रार्थनास्थळ उभारण्यात आले. येथील नागरिकांनी त्या बाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करून त्यावर योग्य कार्यवाही व्हावी अशी मागणी केली होती. आता पुन्हा याच ठिकाणी प्लॉटच्या उर्वरित रिकाम्या भागात अनधिकृत बांधकाम सुरु आहे. पडद्याआड सुरु असलेल्या या अनधिकृत बांधकामामुळे येथील नागरिकांच्या त्रासात अजून भर पडली आहे. जाण्यायेण्याच्या मार्गात अडथळे, नागरी सुविधांचा लाभ घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत. नवीन सुरु झालेल्या अनधिकृत बांधकामाची पोलिस प्रशासनाकडे रीतसर तक्रार केल्यानंतर त्यावर त्वरित कार्यवाही व्हावी यासाठी नागरिकांनी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे धाव घेतली.
नागरिकांच्या विनंतीचा सन्मान करत पालकमंत्र्यांनी त्वरित येथील पोलिस ठाण्यास भेट दिली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि अनधिकृत बांधकामाविरुद्ध अधिकृत कारवाई कण्याचे निर्देश दिले. येथे उपस्थित प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री लोढा म्हणाले, “मालवणीमध्ये सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामाच्या घटना, नागरी सुरक्षा आणि सामाजिक सलोख्याला धक्का देणाऱ्या घटना वाढू नयेत ही पालकमंत्री या नात्याने माझी जबाबदारी आहे. येथील तणाव वाढू नये आणि नागरिकांच्या समस्या सोडवल्या जाव्यात यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असतो. त्यासाठीच आज मी पोलिस प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. आपला कोणी वाली नाही असे नागरिकांना वाटू नये यासाठी नेहमीच आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत असतो. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठीच आम्ही महापालिकेत पालकमंत्री कक्ष स्थापन केला आहे, जनता दरबार आयोजित केले आहेत. आमचे सरकार हे लोकांचे सरकार असल्याने नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ नेहमीच उपलब्ध असेल!”