Makarsankrant 2024 नव्या वर्षातील पहिला सण असून या सणाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. मकरसंक्रातीच्या काळात लहान मुलांचे बोरन्हाण घालण्याची पद्धत आहे. छोटेखानी असा हा कार्यक्रम लहान मुलांसाठी करताना त्यामागील काही शास्त्रीय कारणं जाणून घेणे गरजेचे आहे. केवळ पद्धत म्हणून नाही तर त्या मागील विज्ञान काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही आज करणार आहोत. हे वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांचे बोरन्हाण नक्की घाला आणि आम्हालाही त्यांचे सुंदर सुंदर फोटो पाठवायला अजिबात विसरु नका.
म्हणून घालतात मुलांना बोरन्हाण

बोरन्हाण हा एक लहान मुलांसाठी केला जाणारा घरगुती असा कार्यक्रम आहे. मुलांना छान संक्रातीच्या निमित्ताने काळे कपडे घालून हा दिवस साजरा केला जातो. मुलांच्या अंगावरुन लाह्या, बोरं, उसाचे पेर, भुईमुगाच्या शेंगा, साखर फुटाणे असे टाकले जाते. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का ? की मुलांच्या डोक्यावरुन हे का टाकले जाते? या मागे शास्त्र सांगितले जाते. संक्रात येणाऱ्या या काळात थंडी असते. या दिवसात मुलांना वातावरणाची बाधा होण्याची शक्यता असते. मुलांच्या आरोग्यासाठी काही छान त्यांच्यापुढे ठेवलं की ते खातील अशी शक्यता कमीच असते. पण खेळाच्या माध्यमातून त्यांना काही दिले की ते लगेच खातात. म्हणूनच मुलांच्या डोक्यावरुन या लाह्या टाकल्या जातात. मुलं ती उचलून पटापट खातात. त्यामुळे जे त्यांच्या पोटात जावे अशी इच्छा आहे ते स्वत:हून खातात. यालाच ‘बोरन्हाण’असे म्हटले जाते.
काळ्या कपड्यांचे महत्व
इतर कोणत्याही सणांसाठी काळे कपडे हे वर्ज्य आहेत किंवा आपण काळे कपडे घालायला अजिबात पाहत नाही. परंतु संक्रात हा असा सण आहे ज्या दिवशी तुम्हाला अगदी आवर्जून काळे कपडे घालण्यास सांगितले जातात. लहान मुलांनाही काळे कपड्यांची खरेदी केली जाते. काळे कपडे घालण्यामागेही थंडीत उर्जा मिळावी हे कारण असते. म्हणून या काळात काळ्या साड्या, काळे फ्रॉक असे बरेच कपडे येतात. जे मुलांना अतिशय चांगले दिसतात.
या दिवशी घाला बोरन्हाण
यंदा 15 जानेवारी 2024 रोजी मकरसंक्रात येणार आहे. त्या दिवसापासून ते रथसप्तमीच्या काळापर्यंत तुम्हाला बोरन्हाण घालता येईल. याची तयारी करण्यासाठी तुम्हाला फार काही गोष्टी आणण्याची गरज नाही. तुम्हाला आवडेल अशी सजावट तुम्ही करा. बोरन्हाणासाठी म्हणजेच आंघोळीसाठी तुम्हाला लाह्या, तिळाचे लाडू, साखर फुटाणे, बत्तासा, चॉकलेट, कुरमुरे, उसाचे पेर, भुईमुगाच्या शेंगा आणि बोरं असे घेता येईल. ते एका भांड्यात एकत्र करा.
बाळाला एका पाटावर किंवा आसनावर बसवा. त्याला सुंदर काळे कपडे घाला. हलव्याचे दागिने घालून मस्त तयार करा. आता तुम्ही न्हाणासाठी तयार केलेले साहित्य घरातील आलेल्या लोकांनी डोक्यावरुन टाका. मुलाने ते हाताने वेचून खाणेच महत्वाचे आहे. त्यामुळे जमिनीवर स्वच्छ असा कपडा अंथरा. म्हणजे तुम्ही जे खाण्यासाठी टाकत आहात ते मुलांना सहज उचलून खाता येईल.
मग यंदा नक्की घाला ‘बोरन्हाण’
अधिक वाचा
Happy New Year Wishes 2024 | नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठीतून