स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि गृहरक्षक (होम गार्ड ) तसेच नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक आज जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना जाहीर केली जातात. वर्ष 2023 साठी 53 जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा समावेश आहे. (Agnishaman Seve Padak )
शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल 03 जवानांना ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा शौर्य पदक’ आणि एका जवानाला ‘अग्निशमन सेवा शौर्यपदक’ जाहीर झाले आहे.उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, 8 कर्मचाऱ्यांना, उल्लेखनीय सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ आणि 41 कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा कामगिरीसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.
देशातील 48 कर्मचाऱ्यांना, स्वयंसेवकांना गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ तसेच उल्लेखनीय सेवेसाठी ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ अनुक्रमे 05 कर्मचारी / स्वयंसेवक आणि 43 कर्मचारी/ स्वयंसेवकांना जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर करण्यात आली आहेत.