मुंबई – कंत्राटी भरतीचं पाप १०० टक्के काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि उबाठाचं आहे, हे पुराव्यानिशी उघड करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खोटारड्या विरोधकांना उघडे पाडले. हा जीआर रद्द करुन, “फडणवीस यांनी करुन दाखवले!” महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली की, महाराष्ट्राला अशांत करण्यासाठी प्रत्येक विषयावर हे लबाड कोल्हे आणि लांडगे अशीच कोल्हेकुई करुन जनतेला संभ्रमीत करतात. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे ढोंगी चेहरे उघडे पाडले! त्यांचे दात घशात घातले, अशी सणसणीत प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली आहे.
कंत्राटी भरतीसाठी महाराष्ट्रात पहिला निर्णय १३ मार्च २००३ रोजी झाला. तेव्हाच्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये पहिली कंत्राटी भरती शिक्षण विभागात सुरू झाली. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१० मध्ये जीआर काढून कंत्राटी भरती सुरू करण्यात आली. २०१० मध्ये अशोक चव्हाण यांनी पहिला जीआर काढला आणि परत त्यांनी ६ हजार कंत्राटी पदांसाठी जीआर काढला, तर मुख्यमंत्री पदी उध्दव ठाकरे असतानाही अशीच भरती करण्यात आली होती, हे कागदपत्रांसह आज देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले. यावरून महाराष्ट्राला गेले काही दिवस अशांत करणाऱ्या विरोधकांवर आता भाजपाकडून सडकून टीका करण्यात येते आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी ही याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विरोधकांर जोरदार टीका केली आहे.
ते म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली की, विरोधी पक्षांकडून “झुट की राजनीती” सुरु केली जाते. खोटे, विपर्यास करुन बोलून जनतेमध्ये संभ्रम पसरवला जातो. याची मोठी फँक्टरी मुंबईत प्रभादेवीच्या गल्लीत आहे. या फँक्टरीतून रोज काळा धूर सोडून प्रदूषण केले जाते. आज या प्रदुषणकारी, विषारी चेहऱ्यांवरील बुरखा देवेंद्रजीनी टराटरा फाडला आहे, अशा शब्दांत आमदार अँड आशिष शेलार यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.